पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
बॉलमध्ये घुंगरू…. घुंगराच्या दिशेने धावणारे खेळाडू… आपल्या सवंगड्याच्या आवाजाच्या दिशेने आलेल्या आवाजाचा अंदाज घेत केलेला पास… आणि मग केलेला गोल…. आणि झालेला जल्लोष… हे वातावरण पाहिले की वाटेल एखादे सरावलेले फुटबॉलपटू खेळ खेळात आहेत, असेच सर्वांना वाटेल.. परंतु जर हाच खेळ अंध खेळाडू खेळत असतील तर कोणालाच खरे वाटणार नाही.. वाकड येथे अंध मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यातून आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
माई बाल भवन संस्थेने इंडियन ब्लाइंड फुटबॉल फेडरेशनच्या माध्यमातून अंध मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून 8 राज्यांमधून खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्राच्या संघाकडून भाग्यश्री रुग्गी, कोमल गायकवाड, दिपाली कांबळे, दीपाली पवार, सारिका बरूद ह्यांनी उत्तम कामगिरी केली. रुचिरा इंगळे, विक्रम सिंग, मधुकर इंगळे, प्रवीण देशपांडे यांनी या स्पर्धचे संयोजन केले आहे.
बॉलमध्ये घुंगरू टाकून त्या आवाजाच्या दिशेने खेळाडू पळत असतात. आपल्या टीममधील सहकार्यांच्या आवाजावर संपूर्ण खेळ आधारित असतो. यात प्रत्येक खेळाडूने सातत्याने 'वाय' शब्द उच्चारायचा असतो. ज्यामुळे समोर खेळाडू उभा आहे हे समजते. त्यामुळे खेळताना पडण्यापासून वाचता येते. बॉल पास करण्यासाठी सहकार्याचा आवाज लक्षात ठेवणे महत्वाचे असते.
कोणत्याही खेळात कोच हा महत्वाचा असतो. या खेळात कोच खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. सातत्याने योग्य दिशा देण्याचे काम करत असतात.
घुंगरू बॉल हे फक्त अंध फूटबॉल खेळाडूंसाठी बनवले गेले असतात. पूर्वी पाकिस्तान आणि जर्मनीमध्ये हे बॉल तयार होत होते. बाहेरच्या देशातून बॉल आणणे खर्चिक होते. त्यामुळे वर्गणी काढून हे बॉल मागवले जायचे. पंजाबमध्ये गेल्या 2 वर्षात घुंगरू बॉल बनवले जात आहेत.
अंध फुटबॉल खेळताना खेळाडूंची काळजी घ्यावी लागते. सध्या फुटबॉलपेक्षा हा फुटबॉल थोडा वेगळा असतो. परंतु सरावामुळे अंध खेळाडू देखील उत्कृष्ट पद्धतीने खेळत आहेत. यातून आशिया फुटबॉलसाठी खेळाडूंची निवड होणार आहे.
– मधुकर इंगळे, प्रशिक्षक