आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या स्मित तोष्णीवालला रौप्य | पुढारी

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या स्मित तोष्णीवालला रौप्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्लोवेनिया येथे पार पडलेल्या योनेक्स सोव्हेनिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या नाशिकच्या स्मित तोष्णीवालने रौप्यपदकाला गवसणी घातली. अंतिम लढतीत स्मितला लीन हसिंग-ती हिच्याकडून 21-14 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्मितला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सहावे मानांकन मिळालेल्या स्मित तोष्णीवालने पहिल्या राउंडमध्ये इंडोनेशियाच्या तर्या फराहलाहचा 21-09, 21-19 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपली विजयी मालिका सुरू केली. उपान्त्यपूर्व सामन्यात स्मितने युक्रेनच्या ऑरीना मारुस्कयक हीचा 22-24, 21-10 आणि 21-19 असा पराभव करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीतही स्मितने आपली हीच विजयी लय कायम राखत इंडोनेशियाच्या मुटियारा आयू पुसपित्रासरी हीला 21-17 21-07 असे सहज पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान, 26 ते 29 मे या कालावधीत ऑस्ट्रिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही स्मित भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी तिने विविध गटांच्या 12 राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळविली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ती हैदराबाद येथे चेतन आनंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये नियमित सराव करत आहे. यशस्वी स्मितचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

हेही वाचा :

Back to top button