Texas school shooting : अमेरिका हादरली! आधी आजीवर गोळ्या झाडल्या अन् नंतर त्यानं शाळेत जाऊन १९ मुलांना ठार मारलं! | पुढारी

Texas school shooting : अमेरिका हादरली! आधी आजीवर गोळ्या झाडल्या अन् नंतर त्यानं शाळेत जाऊन १९ मुलांना ठार मारलं!

टेक्सास; पुढारी ऑनलाईन

Texas school shooting : अमेरिकेतील टेक्सास येथील शाळेतील गोळीबाराने अमेरिका हादरली आहे. एका तरुणाने केलेल्या अंधाधुद गोळीबारात १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर यात दोन शिक्षकांनीही जीव गमावावा लागला आहेत. हल्लेखोराला पकडत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ वर्षीय हल्लेखोर तरुण ठार झाला आहे. या घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील टेक्सास येथील प्राथमिक शाळेतील गोळीबारात १९ मुलांचा मृत्यू झालाय. या घटनेबाबत एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ज्या मुलाने हा अंधाधुद गोळीबार केला; त्याने प्रथम आपल्या आजीवर गोळाबार केला. साल्वादोर रामोस असे त्याचे नाव आहे. तो अमेरिकेचा नागरिक असून तो विद्यार्थी आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये रामोसचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात एक तपकिरी केसांचा एक तरुण दिसत आहे, जो त्याच्यासमोर भावहीन टक लावून पाहत आहे.

पहिली घटना हल्लेखोर तरुणाच्या आजीच्या निवासस्थानी घडली. जिथे त्याने त्याच्या आजीला पहिल्यांदा गोळ्या घालून ठार केले, अशी माहिती टेक्सास सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी एरिक एस्ट्राडा यांनी दिली आहे. आजीवर गोळीबार झाल्याने तिला नंतर उपचारासाठी एअरलिफ्ट करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सदर ६६ वर्षीय महिलेला गोळीबारानंतर गंभीर अवस्थेत सॅन अँटोनियो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य सेवा अधिकार्‍यांनी दिली आहे. आपल्या आजीवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर रामोसने बुलेटप्रूफ जॅकेट घालून रायफलसह कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यानंतर तो रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये (Robb Elementary School) गेला. शाळेबाहेर त्याने आपले कार उभी केली. त्याला शाळेबाहेर सुरक्षा अधिकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या हातून निसटला. त्यानंतर त्याने शाळेत जाऊन अंधाधुद गोळीबार केला. मग तिथून त्याने अनेक वर्गात प्रवेश केला आणि गोळीबार (Texas school shooting) सुरूच ठेवला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

रॉब एलिमेंटरी शाळेतील ५०० विद्यार्थ्यांचा गुरुवार हा शैक्षणिक वर्षाचा अखेरचा दिवस होता. येथे ५ ते ११ वयोगटातील मुले शिकतात. या हल्ल्यादरम्यान दोन पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास सुरु आहे. या हल्ल्यामागे हल्लेखोर तरुणाचा हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संशयिताशी संबंधित इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो पहायला मिळाले आहेत. दोन सेल्फी फोटोमध्ये तो काळ्या आणि पांढर्‍या रंगातील हुडी शर्टमध्ये दिसतो. त्याचे केस खांद्यापर्यंत लांब आहेत. इतर फोटोंमध्ये मॅगझिन आणि सेमी-ऑटोमॅटिक रायफल्स दिसतात.

Back to top button