तुळजाभवानी देवीची होणार पुन्हा अभिषेक, पूजा | पुढारी

तुळजाभवानी देवीची होणार पुन्हा अभिषेक, पूजा

तुळजापूर : पुढारी वृत्‍तसेवा :  कोरोना काळात बंद करण्यात आलेले तुळजाभवानी देवीचे दही – दुधाचे अभिषेक पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर विश्वस्तांनी घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर झाली आणि तेथे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरा मंत्री संस्थांकडून जाहीर प्रगटन प्रकाशित करण्यात आले आहे.

दरम्यान, विविध संघटना आणि पुजारी मंडळाकडून अभिषेक पूजा सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती. याविषयी लाक्षणिक धरणे आंदोलनदेखील करण्यात आले होते.

तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीने सोमवार (दि. 23) रोजी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीचे सकाळी होणारे अभिषेक सुरू करण्यात येत आहेत. सकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत देवीचे अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळच्या दुष्काळाबाबत अद्याप निर्णय न झाला नाही. कुलधर्म कुलाचार करण्याच्या अनुषंगाने अभिषेक पूजा महत्त्वाची असून ती बंद असल्यामुळे हजारो भाविक भक्तांचे यादरम्यान अडचण झाली होती. मंदिर प्रशासनाने अभिषेक पूजा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविक भक्तांना पुन्हा तुळजाभवानीची अभिषेक पूजा करता येणार आहे.

मंदिर संस्थानच्या वतीने अधिकृतपणे जाहीर प्रगटन प्रसिद्धी देत असताना अभिषेक करण्याबाबत पुरातत्त्व खात्याच्या सूचना आणि न्यायालय निर्णय यांचे अनुपालन करण्याबरोबर मूर्तीची होणारी झीज याविषयीचा मुद्दा उपस्थित करून या महत्त्वाच्या विषयावर शासनाकडून मंदिर संस्थांना मार्गदर्शन प्रलंबित आहे, असे म्हटले आहे. या अभिषेक पूजेमध्ये उपयोगात आणले जाणारे दही आणि दूध यामध्ये कोणतीही भेसळ असू नये, शुद्ध दही दुधाचा उपयोग करावा, अशी सूचना केली आहे. यामध्ये मूळ मूर्तीवर अभिषेक करावा किंवा कसे असेदेखील जाहीर प्रगटन आत नमूद केले आहेत.

Back to top button