नंदुरबार : नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची तापी नदीत उडी ; नावाड्यांनी वाचविले प्राण | पुढारी

नंदुरबार : नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची तापी नदीत उडी ; नावाड्यांनी वाचविले प्राण

नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा) नापास होण्याच्या भीतीने एका महाविद्यालयीन तरूणीने थेट पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे तिचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले.

यासंदर्भात अधिक वृत्त असे की, महाविद्यालयीन द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी प्रथम बसमधून आली व नंदुरबार जिल्ह्या लगत गुजरात सीमेवर असलेल्या निझर चौफुलीवर उतरली. तिथून जवळच कुकरमुंडा गाव शिवारातील तापी नदीवरील उंच पूल आहे. चालत जाऊन ती त्या पुलावर आली आणि तिने नदीपात्रात उडी घेतली. तापीचे पात्र अतिशय रुंद आणि खोल असल्याने तिचा जीव धोक्यात होता. परंतु वेळीच मासेमारी करणाऱ्या नावाड्यांना ती विद्यार्थिनी बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिथे धाव घेतली.

जोरदार वारा वाहत असल्याने त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले. परंतु अखेरीस तिला वाचविण्यात त्यांना यश आले. उपस्थितांनी रुग्णवाहिका बोलावून तिला तत्काळ निझर रुग्णालयात दाखल केले. या विद्यार्थिनीची ओळख पटली असून ती अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर गावाची रहिवासी आहे. चालू असलेल्या परीक्षेत पुरेसे गुण मिळणार नाही आणि आपण अनुत्तीर्ण होऊ ; असे वाटल्याने नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button