IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन कर्णधारांना ‘फिफ्टी’ची हुलकावणी! | पुढारी

IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन कर्णधारांना ‘फिफ्टी’ची हुलकावणी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या पराभवासह दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली, तर मुंबईच्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचे तिकीट मिळाले. या सामन्यांनंतर आतापर्यंत सहा संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर आता केवळ चार संघांना बाद फेरीतील सामने खेळायचे आहेत. दिल्ली आणि मुंबई प्लेऑफमध्ये न पोहोचण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या कर्णधारांची निराशाजनक कामगिरी. या मोसमात दोन्ही संघांचे कर्णधार फलंदाजीत धावा करण्यात अपयशी ठरले. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा या मोसमात एकही अर्धशतक झळकावू शकले नाहीत.

आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हिटमॅन रोहित आणि ऋषभ पंत यांना आयपीएलच्या एकाही हंगामात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित यंदाच्या मोसमात खराब फॉर्मशी झुंजताना दिसला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा सर्वात खराब हंगाम होता. 2008 पासून आयपीएल खेळणारा रोहितचा हा पहिलाच हंगाम होता, जेव्हा त्याची फलंदाजीची सरासरी 20 च्या खाली राहिली.

रोहितला या मोसमात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 48 धावा होती. हंगामातील 14 सामन्यांमध्ये रोहितने 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेटही 120.18 होता.

ऋषभ पंतच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही…

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतची बॅटही या मोसमात खूप शांत राहिली. पंतने आयपीएल 2022 मध्ये काही जलद खेळी केल्या, पण त्यांचे अर्धशतकात रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला. या मोसमात त्याच्या बॅटमधून एकदाही 50 धावा झळकल्या नाही. पंतने 14 सामन्यांत 30.91 च्या सरासरीने 340 धावा केल्या. या मोसमातील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 44 धावा होती आणि त्याने 151.79 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. पंतने या मोसमात 1, 43, नाबाद 39, 27, 34, 44, 2, 44, 26, 21, 13, 7 आणि नाबाद 39 धावा केल्या.

Back to top button