आसाममध्ये पुराचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू | पुढारी

आसाममध्ये पुराचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये शनिवारी पुराची स्थिती गंभीर झाली. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून पुरामुळे शनिवारी चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये 8.39 लाखांहून अधिक लोकांवर पुराचे संकट कोसळले आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्वात जास्त पूरग्रस्त जिल्हा कछारमध्ये 2 नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. नागाव आणि होजई जिल्ह्यात प्रत्येकी 1, तर कछारमध्ये एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. पुरामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून राज्यातून जाणाऱ्या 11 रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लष्कर, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि जिल्हा प्रशासनासह राज्य आपत्ती व्यवस्थापन दल पुरामधून लोकांची सुटका आणि मदत देण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. नागाव जिल्ह्यात 3,39,427, कछार जिल्ह्यात 1,77,954, होजाई जिल्ह्यात 70,233, दरांग जिल्ह्यात 44,382 आणि करीमगंज जिल्ह्यात 16,382 क्षेत्र पुरबाधीत आहेत. राज्यातील कोपिली, डिसांग आणि ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

पुरामध्ये अडकलेल्या 24,749 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

ASDMA ने दिलेल्या माहितीनुसार, 32 जिल्ह्यांतील 3,246 गावांमधील 1,45,126 मुलांसह 8,39,691 लोक पुराच्या अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्वयंसेवकांच्या मदतीने सुमारे 24,749 अडकलेल्या लोकांची सुटका करण्यात आली. पुरबाधित भागांमध्ये 499 मदत केंद्र आणि 519 मदत वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. राज्यात उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांमध्ये ९२,१२४ लोक राहत आहेत. पुरामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 1,00,732 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button