हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो -कारचा अपघात; एक ठार तर एक जखमी | पुढारी

हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो -कारचा अपघात; एक ठार तर एक जखमी

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते सेनगाव मार्गावर सरकळी पाटीजवळ भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. मनोज देसाई (रा. जुनागड गुजरात ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीने नाव आहे. शुक्रवारी (दि.२०) रोजी सकाळी ७ वाजता हा अपघात झाला. कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साहय्याने दरवाजे वाकवून बाहेर काढण्यात आले.

याबबातची अधिक माहिती अशी की, हिंगोलीकडून आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक कार (जीजे-२७- एए-०१८० ) सेनगावकडे जात होती. हिंगोली ते सेनगाव मार्गावर सरकळी पाटीजवळ कार आली असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने ( एमएच -21-एक्स -2375 ) कारला समोरासमोर धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला.

सरकळी पाटीजवळ मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी कारमध्ये दोघेजण अडकून पडल्याचे दिसले. घटनास्थळी नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे, जमादार महाजन यांनी तातडीने धाव घेऊन जेसीबीच्या साहाय्याने कारचे दरवाजे वाकवून दोघांना बाहेर काढण्यात आले.

यामध्ये मनोज देसाई हे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामध्ये अनेक जण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर टेम्पो चालकाने टेम्पो घटनास्थळी सोडून पळ काढला आहे. याप्रकरणी जखमींचा जवाब घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर देसाई हे गुजरात येथून हिंगोलीकडे कशासाठी आले होते? याची माहिती समजू शकलेली नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button