शिवाजी शिंदे
पुणे : वीजग्राहकांचा जसा वीजवापर आहे, त्या प्रमाणातच सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात आली आहे. म्हणजेच काही वीजग्राहकांना कमीत कमी 30 ते 100 रुपये, तर काहींना अगदी पाच ते दहा हजार रुपयेदेखील सुरक्षा ठेवीची रक्कम आकारली गेली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक अशा प्रकाराचे सुमारे 30 लाख ग्राहक आहेत. या वीजग्राहकांना वेगवेगळ्या रकमेच्या सुरक्षा ठेवी महावितरणने नियमानुसार आकारल्या आहेत. त्यामुळेच ग्राहक त्रासले आहेत. अगोदरच भरमसाट वीजबिलांमुळे ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच सुरक्षा ठेवीच्या रकमेची भर पडली आहे.
वीजग्राहक नवीन असेल, तर त्याची घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, वर्गवारी आणि सिंगल फेज, थ—ी फेज, विद्युत भार या बाबी लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम आकारली जाते. नवीन वीजग्राहक असेल, तर त्या वीजग्राहकांसाठी मागील बारा महिन्यांतील वीजबिलाची सरासरी काढून एक महिन्याची रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. मात्र, 1 एप्रिल 2022 पासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आता दोन महिन्यांच्या वीजबिलांची येणारी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येत आहे.
समजा एकाच आकाराच्या सदनिकेत एकाच भागात राहणार्या एका कुटुंबाकडे वातानुकूलित यंत्रणा आणि इतर विजेवर चालणारी उपकरणे मोठ्या प्रमाणावर असतील आणि दुसर्या कुटुंबाकडे विजेवर चालणार्या उपकरणाचे प्रमाण कमी असेल किंवा त्या उपकरणांचा वापर कमी-जास्त होत असेल, तर त्याचा परिणाम वीजबिलांच्या रकमेवर होतो आणि दोघांना वेगवेगळी सुरक्षा रक्कम ठेव म्हणून आकारली जाते. त्याचप्रमाणे एखादे घर वर्षातील अनेक महिने बंद असेल, तर त्याचा परिणामदेखील बारा महिन्यांच्या सरासरी वीजबिलांवर होतो. असे असले तरी महावितरण आकारीत असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 4.25 टक्के दराने ग्राहकांना व्याज देत असते. ही रक्कम वीजबिलांमध्ये टाकली जाते आणि तेवढी रक्कम वीजबिलामधून महावितरणकडून वजा होते.
हेही वाचा :