परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासह शहरातील ठाण्याअंतर्गत वाढलेल्या मोटारसायकल चोरीचा आढावा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घेत तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार केले. पथकाने या चोरीचा छडा लावत आंबाजोगाई येथील आरोपीला मोठ्या शिताफीने सापळा लावून परळी येथून ताब्यात घेत त्याच्याकडून 20 मोटारसायकली जप्त केल्या. त्या आरोपीची चौकशी केल्यानंतर परभणी, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील दहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. पोलीजुस अधीक्षक परदेशी यांनी अशा चोरींचा आढाव घेत हे गुन्हे उघडकीस करण्यासाठी पथकाला आदेश दिले. यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले.
या अनुषंगाने फौजदार अजित बिरादार, अंमलदार बालासाहेब तुपसमुंद्रे, रवी जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडेख हुसैन पठाण, सायबरचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांच्या पथकाने गोपनीय मिळालेल्या माहितीवरून अखिल महेबूब शेख (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई जि. बीड, ह.मु. परभणी) याने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या शिताफीने त्याला परळी येथून ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे सपोनि. भारती, मुत्तेपोड, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्या अधिपत्याखालील चार पथकांनी आरोपी अखिल याने दिलेल्या माहितीवरून बीड, परळी, लातूर, मरूड, बार्शी, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून 20 मोटारसायकली हस्तगत केल्या. या चोरीतील मोटारसायकलींची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याच्याकडे काही मोटारसायकली असल्याची माहिती आरोपी अखिलने पोलिसांना दिली.
आरोपी अखिलला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक घोरबांड, सपोनि. भारती, मुत्तेपोड, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्यासह आदींनी केली. आरोपीकडून परभणी जिल्ह्यातील सहा, सोलापूर दोन व लातूर जिह्यातील दोन असे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
हेही वाचा