परभणी : आयपीएस लाेढा यांची वाळू माफियांवर मोठी कारवाई ; महातपुरी घाटावर ६.५ कोटींचा मुद्देमाल जप्त | पुढारी

परभणी : आयपीएस लाेढा यांची वाळू माफियांवर मोठी कारवाई ; महातपुरी घाटावर ६.५ कोटींचा मुद्देमाल जप्त

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : येथील आयपीएस सहा. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी गंगाखेड तालुक्यातील महातपुरी वाळू घाटावर आज (दि.१७) सकाळी मोठी कारवाई केली.  ६.५ कोटींच्या एकूण मुद्देमालासह ५ ते ६ हजार ब्रास वाळू जप्त केली आहे.  सध्या आरोपींचा तपास आणि घटनेचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते. या कारवाईत गोदाकाठातील ‘बडे मासे’ पोलिसांच्या ‘रडार’ वर असल्याने वाळू माफियांमध्‍ये खळबळ माजली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील व सोनपेठ पोलिस ठाणे हद्दीतील महातपुरी शिवारात मंगळवारी सकाळी इंजिनच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उत्खनन सुरु हाेते. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी छापा टाकला. या छाप्यात २२ वाळू उडणारे इंजिन (केन्या), १० वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा व ४ जेसीबी मिळून आली . सर्व वाहने व इंजिन पोलिसांनी जप्त केले असून, महातपुरी शिवारात सर्वे नंबर (१५०/३) मध्ये एकूण अंदाजे ५ ते ६ हजार ब्रास रेती (वाळू)चा अवैध साठा (अंदाजे १ हजार हायवा गाड्या भरतील एवढा वाळू साठा) मिळून आला आहे.

अवैधरीत्या उपसा केलेली वाळू व वाहन असा एकूण सर्व मुद्देमालाची किंमत ६.५ कोटी रुपये एवढी आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी केली. त्‍यांची आठवडाभरातील ही परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी दुसरी कारवाई आहे. याआधी त्यांनी वझुर (तालुका पूर्णा) येथील मोठी कारवाई केली होती. गं

गाखेड तालुक्यातील महातपुरी येथील मोठा अवैध वाळूचा उपसा रोखण्यात आयपीएस लोढा यांना यश आले असून, गोदाकाठची अवैधपणे लूट करणारे गोदाकाठातील ‘बडे मासे’ यावेळी पोलिसांच्या ‘रडार’वर असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

या प्रकरणातील आरोपींविरोधात सखोल तपास करून सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयपीएस श्रेणिक लोढा यांनी ‘पुढारी’ शी बोलताना दिली.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button