औरंगाबाद : संतप्त महिलांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश | पुढारी

औरंगाबाद : संतप्त महिलांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : कन्नड शहर आणि तालुक्यातील तब्बल २२ हून अधिक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने मंगळवारी जनशक्ती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यात अनेक महिला रिकाम्या घागरीसह सहभागी झाल्या होत्या.

जनशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमुद केले की, कन्नडमध्ये शहर आणि तालुक्यातील २२ हून अधिक गावात अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामात फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती देखील केली नाही. याशिवाय टाकळी व नागरदारक प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना देवगाव (रं) इसनाबाद, भिलदरी (नागद), नागदतांडा, सावरगाव, गव्हाली तांडा, जेहूर तांडा, गौरपिंप्री, गुदमा, रामपुरवाडी, पुरणवाडी, मेहूण, धामणडोह, उंबरखेडा, कुंजाखेडा, साहेबवाडा, रेलंडा, उंबरखेडा, करंजखेडा, तलाववाडी, गोकुळवाडी, भांबा आणि भारंबातांडा ही गावे मोठ्या पाणीटंचाईस तोंड देत आहेत.

आम्हाला जिल्ह्याचे नामकरण, मशिदीवरील भोंगे, कबरीवर माथा कोणी टेकला याचे घेणेदेणे नाही. मुबलक पाणी मिळाले पाहिजे, एवढीच मागणी आहे, असे संघटनेच्या विनीता बर्फे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button