ज्येष्ठ कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन | पुढारी

ज्येष्ठ कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

जुन्या पिढीतील ज्येष्ठ कसोटी क्रिकेटपटू व महाराष्ट्राचे माजी कर्णधार सदाशिव रावजी पाटील उर्फ  एस. आर. पाटील (वय ८७ ) यांचे आज (दि.१५) पहाटे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील एक मितभाषी, गुरूतुल्य, निगर्वी, अष्टपैलू खेळाडू लोप पावला आहे.

ज्येष्ठ क्रिकेटपटू पाटील यांचा जन्म १० ऑक्टोबर १९३३ रोजीचा पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे शेतकरी कुंटुबात झाला. त्यांना शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड होती. त्याचे शालेय शिक्षण न्यू हायस्कूल येथे झाले. ज्येष्ट क्रिकेट खेळाडू कै. महिपतराव इंदुलकर यांनी त्यांना कोल्हापूरात क्रिकेटचे धडे दिले. तसेच त्यांना छत्रपती शहाजी महाराजांचे प्रोत्साहन व जतचे राजे डफळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सन १९५२ ते ६४ या कालावधीत महाराष्ट्र संघाकडून खेळताना ३६ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ८६६ धावा व ३०/६०च्या सरासरीने ८३ बळी त्यांनी घेतले. यामध्ये ३८ धावांत ५ बळी ही सर्वोत्तम कामगिरी पाटील यांच्या नावावर होती. २ ते ७ डिसेबंर १९५५ ला मुंबईत झालेल्या न्युझीलंड विरूध्द भारत या कसोटी सामन्यासाठी त्यांची निवड झाली होती. या सामन्यात १४ धावा व दोन्ही डावात न्युझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जॉन रिड यांचा महत्वपूर्ण बळी घेत विजयात मोठा वाटा उचलला होता.

एस. आर. पाटील यांनी उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये ३६ वर्षे नोकरी केली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लडमधील नामांकीत क्लबकडून अष्टपैलू कामगिरी केली होती. इंग्लडमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ३ वेळा त्यांनी पटकावला होता. एस. आर. पाटील यांच्या अष्टपैलू कामगिरीची ठळक प्रसिध्दी इंग्लडमधील प्रमुख वृत्तपत्रात प्रसारीत व्हायची.

एस. आर. पाटील यांना कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५ जुलै २०१७ रोजी “जीवन गौरव पुरस्कार” देण्यात आला होता. तसेच २०१५ मध्ये इंग्लडमध्येही त्यांचा त्यांचा सत्कार झाला होता. 

पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे.

 

Back to top button