मालेगाव : कचरा रस्त्यावर टाकल्यास 10 हजार दंड ; दुकानदार, टपरीचालकांना नोटीसा | पुढारी

मालेगाव : कचरा रस्त्यावर टाकल्यास 10 हजार दंड ; दुकानदार, टपरीचालकांना नोटीसा

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
अस्वच्छतेच्या मुद्द्यावर सामाजिक संघटनांसह नगरसेवकांनी आगपाखड केल्यानंतर मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. शहरातील दुकानदार, फेरीवाले आणि टपरीचालकांना नोटीस बजावण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सार्वजनिक नागरी सुविधा समितीने महापालिकेवर शोभायात्रा काढून मोसम नदी अस्वच्छतेसह विविध नागरी समस्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन केले होते. त्यानंतर झालेल्या महासभेतही स्वच्छतेचा विषय गाजला. जनता दलाच्या नगरसेवकांनी साफसफाईच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरत महापौरांसमोरील हौदात ठिय्यादेखील दिला होता. सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी स्वच्छता विभागावर ताशेरे ओढल्यानंतर प्रशासनाने विषय गांभीर्याने घेतला. गुरुवारी (दि. 12) गूळबाजार, रामसेतू पूल परिसरातील कटलरी, प्लास्टिक-थर्माकॉल विक्रेते, मासे, चप्पल विक्रेते आणि पानटपरीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. आस्थापनेजवळ कचरा टाकल्यास 10 हजारांचा दंड ठोठावण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बहुतांश व्यावसायिक आपला कचरा थेट मोसम नदीपात्रात रिता करतात. संबंधितांवर कारवाईसाठी नदीपात्र परिसरात मनपाने कर्मचारी नेमावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button