रत्नागिरी : जन्मदात्या बापाकडून दीड महिन्याच्या चिमुकल्याची 60 हजारांना विक्री | पुढारी

रत्नागिरी : जन्मदात्या बापाकडून दीड महिन्याच्या चिमुकल्याची 60 हजारांना विक्री

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : महिलेच्या पतीसह अन्य चारजणांनी संगनमताने अवघ्या दीड महिन्याच्या बाळाची 60 हजार रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात घडली.

या घटनेमध्ये विवाहितेचा पती प्रसाद नरेंद्र हातिम (रा. रहेजा कॉम्प्लेक्स, मालाड, मुंबई), बाळ खरेदी करणारे दाम्पत्य आज्ञा संतोष माने, तिचा पती, संतोष विजय माने (दोन्ही रा. शिवरेवाडी शिरगाव, रत्नागिरी), मयुरी निखिल जाधव (रा. अंधेरी, मुंंबई) आणि अजय जाधव (रा. बदलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सिद्धी प्रसाद हातिम (24, रा. रहेजा रहेजा कॉम्प्लेक्स, मालाड, मुंबई) हिने गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दि. 23 फेब्रुवारी, 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात या पाच संशयितांनी संगनमताने सिद्धी हातिम यांना धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून बेकायदेशीर दत्तकविधान पत्रावर सह्या घेऊन सिध्दी हातिम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची 60 हजार रुपयांना खरेदी-विक्री केली. त्या नंतर पीडितेचा पती प्रसादने तिला घराबाहेर काढून सोडून दिलेले आहे.

या प्रकरणी पाच जणांविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 80,81 भादंवि कायदा कलम 323,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.

Back to top button