बीड : ४० हजारांची लाच घेताना पीएसआय ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

बीड : ४० हजारांची लाच घेताना पीएसआय 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

अंबाजोगाई : पुढारी वृत्तसेवा : हवेत गोळीबार केल्याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु, तहसील कार्यालयातून प्रतिबंधात्मक जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरिक्षकाने ५० हजार रूपयांची लाच मागितली. यात तडजोड होऊन ४० हजार देण्याचे ठरले. याची माहिती तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार एसीबीने तीनवेळा उपनिरीक्षकाला पकडण्यासाठी ट्रॅप लावला. परंतु, तिन्ही वेळेस त्यांने हुलकावणी दिली. मात्र, चौथ्या वेळेस आज (दि.११) उपनिरीक्षकाला त्याच्या घरी ४० हजार रूपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गोपाळ दिगंबर सुर्यवंशी असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकाचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, अंबाजोगाई शहरात एका लग्न समारंभात हवेत गोळाबार केल्याप्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन दिला. परंतु गुन्हा दाखल असलेल्या शहर पोलिसांनी त्यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून किंवा अंबाजोगाई तहसील कार्यालयातून जामीन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यातून बीडऐवजी अंबाजोगाईच्या तहसीलमधून जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सुर्यवंशी यांनी या दोन्ही आरोपीकडे ५० हजारांची मागणी केली. यात तडजोड होवून ४० हजार रूपये देण्याचे ठरले.

यानंतर तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी २ मे, ४ मे आणि ७ मेरोजी त्याच्यावर सापळा लावला. या तिन्ही वेळेस सापळ्यातून सदर पोलीस उपनिरिक्षक निसटले. परंतु, पोलीस स्टेशननंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, यशवंतराव चव्हाण चौक आदी ३ ठिकाणे बदलून अखेर गोपाळ सुर्यवंशी याच्या खाजगी निवासस्थानी त्याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सुर्यवंशी याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बाळासाहेब पवार करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button