राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; कोठडीत गैरव्यवहार केल्याचा दावा | पुढारी

राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; कोठडीत गैरव्यवहार केल्याचा दावा

खार (मुंबई) : पुढारी ऑनलाईन

राणा दाम्पत्य आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आहे. ते दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईची तक्रार दिल्लीत करणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राणा म्हणाले, पोलिसांचा वापर करून आमच्यावर अत्याचार करण्यात आला. ऑनलाईनच्या माध्यमातून माझ्या फ्लॅटची पाहणी मुख्यमंत्र्यांनी करावी. अडचण असेल तर संजय राऊत आणि अनिल परब यांना पाहणीसाठी पाठवावे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत की नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: फ्लॅटची कागदपत्रांची तपासणी करावी. आम्हाला खार पोलिस ठाण्यात पहाटे ५ वाजेपर्यंत पाणी दिलं गेलं नाही. खार पोलिस ठाण्यात सतरंजीही देण्यात आली नाही. पोलिस ठाण्यात उभं राहावं लागलं. मुख्यमंत्र्यांची दडपशाहीची तक्रार दिल्लीत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही, दिल्लीत जाऊन प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी नमूद केले.

Back to top button