नाशिक : एसटी महामंडळाची ‘महाकार्गो’ सुसाट, खासगी ग्राहकांचाही मिळतोय प्रतिसाद | पुढारी

नाशिक : एसटी महामंडळाची ‘महाकार्गो’ सुसाट, खासगी ग्राहकांचाही मिळतोय प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तब्बल साडेपाच महिन्यांनंतर कर्मचार्‍यांचा संप मिटल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर आली आहे. प्रवासी वाहतूक सेवेपाठोपाठ एसटीची महाकार्गो सेवाही रुळावर येत आहे. शासकीय विभागांसह खासगी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महाकार्गो सुसाट धाव असल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक क्षेत्रात प्रवेश केला होता. तोट्यात असलेल्या एसटीला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने ‘महाकार्गो’ सेवेच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक एसटी विभागात, जिल्हा आणि शहरात शासकीय उत्पादनाचे 25 टक्के वाहतुकीचे काम एसटीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वस्त अन्नधान्य, महाबीजसारख्या महामंडळांसह बालभारतीसारख्या संस्थेच्या साहित्याच्या वाहतुकीचे नियोजन एसटी महामंडळावर सोपविण्यात आले आहे.

‘महाकार्गो’ सेवेसाठी एसटी महामंडळाने प्रवासी एसटी गाड्यांमध्ये बदल करून त्याचे मालवाहतूक ट्रक तयार केले आहेत. नाशिक विभागात सध्या 50 मालवाहतूक ट्रक धावत आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यात अत्यावश्यक अन्नधान्याची वाहतूक, कीटकनाशके, खते, बी-बियाणे, रंगाचे डबे, लोखंडी रॉड अशा शासकीय व खासगी वस्तू ‘महाकार्गो’द्वारे पोहोचविण्यात येत आहे. विशेषत: नाशिक विभागातून मुंबई, भिवंडीसह पुणे मार्गाला खासगी ग्राहकांची पसंती मिळत आहे.

एसटीच्या उत्पन्नात भर
एसटी कर्मचार्‍यांच्या अघोषित संपाचा फटका महाकार्गो सेवेलाही बसला होता. राज्यातील 1 हजार 150 मालवाहतूक बसेस आगारात उभ्या राहिल्याने महाकार्गो सेवा ठप्प झाली होती. आता संपानंतर एसटीची ‘महाकार्गो’ सेवा सुरळीत झाली आहे. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत महिन्याला लाखो रुपयांची भर पडेल, असा विश्वास एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button