रायगड : पोलादपूर तालुका हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक | पुढारी

रायगड : पोलादपूर तालुका हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

पोलादपूर (रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : राज्यात सर्वत्र मशिदीवरील भोंग्याचा आवाजाबाबत राजकारण सुरू आहे. अनेक ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा इशारा देण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका मात्र राजकारणापासून लांब आहे. गावात एकोपा व शांतताचे महत्व जपत हिंदू – मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक पहावयास मिळाले.

गेल्या काही दिवसापासून भोंग्याबाबत वातावरण चांगलेच तापत आहेत. मनसे पक्षाकडून भोंगे बंद करावे असा इशारा दिला होता. राज्यातील गृह विभागाने मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नोटिसा पाठवत जमावबंदीचे आदेश लागू केले. याला अनुसरून पोलादपूर शहरातील मनसे सैनिकांनाही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र सर्वच सण उत्सव आनंदाने साजरे करण्यात आले.  येथील बांधवांनी आम्ही सर्व भारतीय असल्याचे दाखवत ऐक्याचे प्रतिमेला तडा जाणार नाही,  याचे भान ठेवत एकमेकांना शुभेच्छा देत भेटी गाठी घेतल्या.

शहरात मशिदीवरून न्यायालयाच्या निर्णयानुसार अजाण देण्यात आली. तसेच नमाज पठण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसैनिकांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत त्‍यांचे स्वागत केले. शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार व कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मुस्लिम बांधव व मनसे कार्यकर्ते याची एकत्र बैठक घेतली होती. सण उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन केले होते.

सपोनि जाधव या बैठकीत म्‍हणाले, शहर तालुका शांतताप्रिय आहे. एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे लोक आहेत, असे सांगत हा तालुका दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. दोन घाट असल्याने एखादा अपघात घडल्यास लोक मदतीसाठी तत्पर धावत जातात. या वेळी आम्ही कोण आहोत हा विचार न आणता आम्ही प्रथम भारतीय आहोत,  अशी भावना ठेवून मदत कार्य करत असतात असे जाधव म्‍हणाले.

तसेच, मनसे प्रमुख दर्पण दरेकर म्‍हणाले, मुस्लिम बांधवानी नियमांचे पालन केले आहे. तर आम्ही सर्व एक आहोत. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या ठिकाणी नियमांचे पालन होईल तेथील मुस्लिम बाधवांचे स्वागत करा. त्‍यानुसार मुस्लिम बाधवांचे स्वागत करण्यात आले आहे असे दरेकर म्‍हणाले.

न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार अजाण व नमाज पठण करण्यात आले आहे. या पुढे ही नियमांचे पालन करण्यात येईल असे सांगत हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कायम टिकून राहणार आहे, असा आशावाद मुस्लिम बांधवांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा  

Back to top button