पुणे : दिल्ली, हरियाणातील दोन तरूणींनी सत्संगातील महिलेचे दागिने लांबविले | पुढारी

पुणे : दिल्ली, हरियाणातील दोन तरूणींनी सत्संगातील महिलेचे दागिने लांबविले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढल्या असून लग्नकार्यातही चोरीचे प्रकार होऊ लागले आहेत. आता चोरट्यांनी आपला मोर्चा धार्मिक सत्संगकडे वळवला असल्याचे एका चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे. दिल्ली आणि हरियाणा येथून आलेल्या २ तरूणींनी पुण्यातील सत्संगातील महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी केली. या तरूणींना भक्तांनी पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. आरती राजकुमार ( वय २४ रा. हरियाणा) आणि सोनिया उमरपाल (वय २६, रा. नजबगड, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत.

याबाबत सहायक फौजदार अविनाश शेवाळे यांनी सांगितले की, पुणे- नगर रस्त्यावरील जकात नाका जवळील महालक्ष्मी लॉन्स येथे २ मेरोजी सुदिक्षा हरदेव यांच्या निरंकारी संत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शेकडो भक्त संत्संग ऐकण्यासाठी आले होते. सत्संग सुरू असताना बारामती येथून पुण्यात संत्संगाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेल्या फिर्यादी महिलेची सोनसाखळी कोणीतरी ओढल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीला याची भणक लागताच त्यांनी आराडाओरड केल्याने तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या दोन तरूणींना पकडले.

त्यांना विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी आपण दिल्ली आणि पंजाब येथे राहत असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या पत्त्याच्या व माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी दिल्लीच्या स्थानिक पोलिसांशी व हरियाणातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना आरती आणि सोनिया यांच्याबाबत माहिती घेण्यास सांगितले. यामध्ये सोनिया हिचे पोलिसांनी घर शोधूनही त्यांना तिचे घर सापडले नाही. मात्र, आरती हिच्या हरियाणातील घरी जाऊन चौकशी केल्यानंतर ती सासरी नांदत आहे. तिला एक अडीच वर्षाची मुलगी असून ती घरात कोणाला न सांगता बाहेर पडल्याचे तिच्या घरच्यांनी सांगितले. तसेच ती वारंवार घरातून अशीच निघून जात असल्याची माहितीही तेथील स्थानिक पोलिसांना मिळाली. तशी माहिती हरियाणा पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस फौजदार अविनाश शेवाळे करीत आहेत.
एक तरूणी दिल्ली तर दुसरी तरूणी हरियाणा येथील आहे. त्याना संत्सगात चोरी करताना पकडण्यात आले आहे. मात्र, चोरी गेलेल्या दागिन्यांविषयी दोघींकडे चौकशी करूनही त्यांनी अद्यापही कोणतीही माहिती दिली नाही. त्यांचा अन्य साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने दोघींकडे चौकशी सुरू आहे. दोघींवर संगणमताने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सहायक फौजदार अविनाश शेवाळे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button