चंद्रपूर जिल्ह्यात तीन बड्या अधिकाऱ्यांना तब्बल ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात तीन बड्या अधिकाऱ्यांना तब्बल ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलासाठी व उर्वरित रक्कम वितरित करण्यासाठी ५० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी चंद्रपूर येथील मृद जलसंधारण विभागातील २ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई नागपूर येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री उशिरा केली. या कारवाईत नागपूरच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे (४६), नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील (वय ३२), चंद्रपुरातील विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम (वय ३५) यांचा समावेश आहे.

तक्रारदार नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्याकडे मृद व जलसंधारण कार्यालय नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूरी बंधारा सर्वेक्षणाचे काम होते. काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण विभागात बिले सादर केले, पण बिलाची रक्कम काढून देण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रादेशिक जल संधारण अधिकारी कविजीत पाटील व उपविभागीय जल संधारण अधिकारी तथा प्रभारी जल संधारण अधिकारी श्रावण शेंडे व विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनी तक्रारदाराला ८१ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर पन्नास लाख रूपये देण्याचे ठरले.

मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या बाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचेशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी या प्रकरणाची पडताळणी करीत आरोपींना पकडण्यासाठी मंगळवारी सापळा रचला असता ५० लाख रुपये स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नागपूर व चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या केली. पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापूरे यांचे नेतृत्वात पोलिस निरीक्षक सचिन मते, सारंग मिराशी, प्रवीण लाकडे, जितेंद्र गुरुनुले, पो. ना. संतोष पंधरे, विकास सायरे, सारंग बालपांडे, सुनील यादव, बबिता कोकर्डे, गीता चौधरी, अस्मिता मे्राम, करूना शहारे, हरीष गांजरे, अमोल भक्ते, चंद्रपूर येथील रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे, अमोल सिडाम, पुष्पा काचोरे, सतीश सिडाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button