परीक्षेला समर्थपणे सामोरे जा | पुढारी | पुढारी

परीक्षेला समर्थपणे सामोरे जा | पुढारी

नरेंद्र क्षीरसागर

शालेय जीवनातील असो वा कॉलेज जीवनातील परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी, युवामंडळी धडपडत असतो. दहावीनंतर परीक्षेचे प्रमाण वाढते. प्रवेश परीक्षा, कौशल्य विकास परीक्षा, सेमिस्टर परीक्षा यांसारख्या परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांची भंबेरी उडते. परीक्षेचे वेळापत्रक सांभाळताना पुरेसा आहार, झोप, आराम आणि अभ्यास याचाही ताळमेळ साधावा लागतो. सध्या स्पर्धा प्रचंड वाढल्याने मुले 16-16 तास अभ्यास करतात. कधी कधी या ताणाचा प्रकृतीवरही परिणाम होऊ शकतो. विशेषत: परीक्षेच्या काळात मुले नर्व्हस होतात. अभ्यास होऊनही आत्मविश्‍वास ढळू लागतो. प्रत्येक परीक्षेत आपला अभ्यास चांगला राहवा यासाठी प्रयत्नशील राहणारी मुले ऐनवेळी एखाद्या मुद्द्याने किंवा प्रश्‍नाने आत्मविश्‍वास गमावून बसतात. परंतु, किरकोळ बाबीवरून खचून जायचे कारण नाही. कोणतीही जोखीम न उचलता आणि ताण न घेताही या परीक्षेला समर्थपणे आणि आत्मविश्‍वासपूर्वक सामोरे जाणे शक्य आहे. यासाठी काही गोष्टी येथे सांगता येतील. 

एकाग्रता वाढवण्यासाठी पुरेशी झोप : अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना झोपेवर पाणी सोडावे लागते. युवापिढीतील तरुणांना किमान सात तास शांत झोप असणे गरजेचे आहे. जर पुरेशी झोप घेतली नाही तर दिवसभर आणि अभ्यासाच्या कालावधीतही शरिरात थकवा राहतो आणि उत्साह गमावून बसतो. जर चांगली आणि शांत झोप झाली तर उत्साह टिकून राहतो आणि एकाग्रता कायम राहते. अतिजागरणामुळेही तब्येतीवर परिणाम होतो. याउलट रात्री वेळेत झोपल्यास पहाटेवेळी लवकर उठून केलेला अभ्यास फायद्याचा ठरतो.

सोशल मीडियापासून दूर : सध्या अभ्यासातील सर्वात मोठा अडथळा हा सोशल मीडियाचा आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अ‍ॅप, टेलिग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटमुळे मुलांची एकाग्रता भंग पावली आहे. अशा स्थितीत या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी काही काळासाठी सोशल नेटवर्किंगला रामराम ठोकणे गरजेचे आहे. आपले अकाऊंट डी-अ‍ॅक्टिव्हेट करून चॅटिंगपासून काही काळ दूर राहवे. जोपर्यंत परीक्षा संपत नाही, तोपर्यंत सोशल मीडियापासून चार हात लांब रहावे. तसेच काही अभ्यासाविषयी शंका-कुशंका विचारण्यासाठीच मोबाईल सुरू ठेवा आणि तशी सूचना मित्रांना द्यावी. चॅटिंगवर एकमेकाला एंटरटेन करणेही काही काळ थांबवावेे. 

अभ्यासाचे वेळापत्रक : अभ्यासाचे अचूक व्यवस्थापन आणि वेळापत्रक  हे देखील उत्तम यशाला कारणीभूत ठरते. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार  विविध विषयांचे दिवस आणि वेळ निश्‍चित करून अभ्यासाचे नियोजन करावे. अवघड विषयाला अधिक दिवस आणि कमी महत्त्वाचे आणि सोप्या विषयाला कमी दिवस असे वर्गीकरण करावे. पाठ्यपुस्तक, कॉलेजमधील नोटस, अभ्यासमाला, क्लासेसमधील नोटस, स्वत: काढलेल्या नोटस यासर्व संदर्भातून आपल्याला विषयाची तयारी करावी लागते. न समजलेल्या गोष्टीचे टिपण काढून त्याचे शंकानिरसन सरांकडून, मित्रांकडून करून घ्यावे. ठरवलेल्या वेळेत अभ्यास पूर्ण करण्यासाठी आग्रही राहवे. कोणताही विषय अर्धवट सोडून न देता, त्यातील अडचणी शोधून उत्तरे काढावीत. 

अभ्यासासाठीचे वातावरण  : अभ्यासासाठी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले पाहिजे, असे नाही. एकाच ठिकाणी बसून अभ्यास करण्याचे टाळावे. कधी खोलीत, कधी ग्रंथालयात तर कधी हॉलमध्ये, गच्चीवर अशा विविध ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. एकाच ठिकाणी बसण्यापेक्षा हॉलमध्ये चकरा मारत वाचन, अध्ययन करावे. अभ्यासाला प्रत्येक वेळी जागा बदलली तर उत्साह राहतो अणि जागाबदलामुळे नावीन्य राहतेे.

एकदातरी पूर्ण पुस्तक वाचा : पाठ्यपुस्तकातच आपल्या प्रश्‍नांची उत्तरे दडलेली असतात. यासाठी गाईडची गरज नसते. मात्र, काही जण एखादी संकल्पना समजून घेण्यास किंवा सोपी करून घेण्यासाठी गाईडचा आधार घेतात. मात्र, शक्यतो पाठ्यपुस्तक वाचनावरच भर द्यावा. तसेच वाचनादरम्यान, प्रत्येक ओळीची चिरफाड करण्याची गरज नाही किंवा त्याचे मुद्दे काढण्याची आवश्यकता नाही. एखाद्या कादंबरीप्रमाणे पाठ्यपुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. केवळ वाचनातूनही अनेक मुद्दे लक्षात येतात. 

दररोज थोडेथोडे वाचन करा : दररोज किमान पाच पाने नियमितपणे वाचण्याचा प्रयत्न करावा. अशारितीने दररोज वीस मिनिटे का होईना सलगपणे वाचनाचा सराव करत तो हळूहळू वाढवावा. एकदम भाराभार वाचल्यास त्यातील गोष्टी समजतील किंवा लक्षात राहतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शांतपणे, आपल्या आवडीच्या वेळी वाचनाचा सराव करावा. त्यातून काही मुद्दे लिहून काढावेत. वाचन पूर्ण झाल्यानंतर उत्तरे लिहून काढावीत आणि त्याची पडताळणी करावी. उत्तर लिहिण्याचा वेगही आजमावा. 

मनन,  चिंतन  करा :  वाचन, लिखाणाबरोबरच मनन, चिंतनाचा प्रयत्न करावा. दिवसभरात केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी. तसेच शारिरीक आणि मानसिक क्षमता राखण्यासाठी व्यायाम, योग, प्राणायाम करण्यासही वेळ द्यावा. दिवसभरातील केवळ 15 मिनिटेही पुरेसे आहेत. संतुलित आहार आणि व्यायामाचा सराव राखल्यास अभ्यासात एकाग्रता राहते. 

Back to top button