Urban Planning : शहर नियोजनातील करिअर संधी, ‘या’ अभ्यासक्रमाची गरज, भविष्यातील संधी | पुढारी

Urban Planning : शहर नियोजनातील करिअर संधी, 'या' अभ्यासक्रमाची गरज, भविष्यातील संधी

वनिता कापसे

शहरीकरण ही एकविसाव्या शतकाची प्रमुख ओळख बनत चालली आहे. जागतिकीकरणानंतरच्या बदलत्या अर्थकारणात खेड्यांकडून शहरांकडे जाणारा लोकसमुदाय वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरांचे बकालीकरण होऊ लागल्याने दशकभरापूर्वी स्मार्ट शहरे विकसित करण्याची योजना अवतरली. येणार्‍या काळात ही योजना अधिक महत्त्वाची ठरत जाणार आहे आणि त्यासाठी नगररचनाकार, शहरनियोजनातील तज्ज्ञ-अभ्यासक यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.

नगररचनाकाराचे पथक शहराचा कायापालट करण्यासाठी आणि चकचकीत करण्यासाठी नियोजन करत असतात. त्यानुसार शहराचा नियोजनबद्द विकास केला जातो. अरुंद रस्ते रुंद करणे, शहराच्या परिसरात नवीन वसाहती निर्माण करणे, सांडपाण्याची व्यवस्था, जुनी रचना बदलून त्यास नवे रूप देणे, शासकीय जुन्या इमारतीचे पुनर्निर्माण करणे, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरातील सुशोभीकरण, रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते सुचविणे आणि त्यानुसार आरखडा तयार करणे अशा अनेक गोष्टी आहेत की शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो.

देशात विविध ठिकाणी शहरे स्मार्ट करण्यासाठी परदेशातील धर्तीवर नियोजन केले जात असून हे नियोजन नगररचनाकार करू शकतात. ज्या आधारावर शहराचा विकास केला जातो, जर आपल्याला आर्किटेक्चअर आणि टाऊन प्लॅनिंगमध्ये रस असेल तर त्या क्षेत्रात चांगले करिअर करू शकता.

अर्बन प्लॅनिंग म्हणजे काय?

अर्बन प्लॅनिंगच्या माध्यमातून कम्युनिकेशन नेटवर्क आणि ट्रान्सपोर्टेशन लक्षात घेऊन शहराच्या नागरी पर्यावरणाचा आराखडा तयार केला जातो. यादरम्यान जमिनीचा योग्य वापर कसा होईल आणि शहराचे पर्यावरण कसे सुरक्षित राखले जाईल याची काळजी घेतली जाते. अर्बन सिटी प्लॅनिंगनुसार नवीन शहराचा आरखडा तयार केला जातो; मात्र अनेकदा जुन्या शहरातील रचनेत बदल करावा लागतो आणि त्यासाठी अर्बन प्लॅनिंगची गरज पडते. त्याला सिटी किंवा टाऊन प्लॅनिंगही म्हटले जाते. उदा. अनेक जुन्या शहरात रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारे पुतळे किंवा जुने वाडे ही बाजूला सुरक्षित ठिकाणी पुन्हा वसविण्यात येतात. जेणेकरून जुन्या ऐतिहासिक वस्तूंना धक्का लागत नाही आणि शहराचे वाहतूक नियमनही योग्यरितीने होते. परदेशातही जुनी शहराच्या रचनेत बदल करून नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या कामी नगररचनाकारांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते.

कोणत्या अभ्यासक्रमाची गरज

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावी सायन्सला फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण अर्बन किंवा रुरल प्लॅनिंगमध्ये बीटेक किंवा बॅचलर ऑफ टाऊन प्लॅनिंग कोर्स करू शकता. यानंतर आपण सिटी प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग, अर्बन अँड रुरल प्लॅनिंग, टाऊन अँड कंट्री प्लॅनिंगमध्ये मास्टर पदवी मिळवू शकता. भविष्यात यात आपण डॉक्टरेटही मिळवू शकता.

भविष्यातील संधी : आजकाल टाऊनशिप्स आणि स्मार्ट सिटीजवर वेगाने कामे होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात संधी वाढतच चालली आहे. आपण सरकारी पातळीवर जसे की टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग विभाग, हाऊसिंग बोर्डस, नगरविकास, शहर विकास प्राधिकरण, जिल्हा आणि ग्रामीण नियोजन विभागातील साहायक टाऊन प्लॅनरच्या रूपात काम सुरू करू शकता. खासगी कंपन्यातील प्रॉपटी फर्म्स, रियल इस्टेट फर्म्स, सोशल एजन्सी, नॉन प्रॉफिट हाऊसिंग ग्रुप्स आणि इंटरनॅशनल कन्सल्टिंग कंपनीत काम करू शकता.

कसे हवे कौशल्य : एका अर्बन प्लॅनरजवळ अ‍ॅनालिटकल स्किल्स असणे खूप गरजेचे आहे. कारण प्लॅनरला आर्थिक आणि पर्यावरणावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास करावा लागतो. याशिवाय लोकसंख्या, बाजारपेठेच्या संशोधनातून काढलेला निष्कर्ष हे एकत्र करून अहवाल तयार करावा लागतो आणि त्याचे विश्लेषणही करावे लागते. त्यासाठी आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय एक अर्बन प्लॅनरचे संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, व्यवस्थापन कौशल्य, लिखाणकौशल्य चांगले असणे महत्त्वाचे आहे.

Back to top button