कथा : शिवाचा गौरव | पुढारी | पुढारी

कथा : शिवाचा गौरव | पुढारी

शिवा मातीचे चांगले माठ करीत असे. माठ सुंदर आणि टिकावू असत. या माठांना इतर ठिकाणहूनही मोठी मागणी असे. शिवा आपले गाढव घेऊन नदीकाठची तांबडी मातीची पोती गाढवाचे पाठीवर टाकून अंगणात माती आणीत असे. पाणी आणि कोंडा मातीत मिसळून अतिशय चांगला चिखल बनवत असे. या चिखलाचे सुंदर नक्षीदार माठ शिवा बनवीत असे. या माठामुळे या गावाचे नाव जणू माठाचे गाव व शिवा माठ्याला असे झाले होते. 

हिवाळा संपला की शिवा थोडे  माठ गाढवावर ठेवून जवळच बाजारला जाऊन विकत असे. राजदरबारातही शिवाचे माठ वापरले जात असत. एक दिवस राजाने पाणी पिताना माठ पाहिला. माठावरील सुंदर नक्षीकाम आणि माठाचा छानसा आकार आणि माठातील थंड व वाळा घातलेले  पाणी हे सगळे राजाला फार फार आवडले. राजाने कोतवालाकडे हा माठ कोण तयार करतो व कसा तयार करतो ते विचारले. 

कोतवालाने सगळी चौकशी केली. कोतवालाने शिवा माठवाला हा माठ बनवितो, गाढवावरून माती वाहून आणतो. चिखल करतो व सुंदर कसब वापरून मातीचा गोळा चाकावर फिरवून छान माठ बनवतो. अनेक गावचे लोक शिवाचे माठ वापरतात. 

संबंधित बातम्या

शिवाचा राजाला अभिमान वाटला. अशा कारागीराचा पारितोषिक देऊन गौरव करावा असे राजाने ठरवले. गाढवावरून माती शिवाला आणावी लागते. गाढवाऐवजी आपण एखादा मोठा बैल शिवाला पारितोषिक रूपाने दिला तर माती आणणे, माठ विकायला नेणे यासाठी किती सोपे होईल. राजाने नियोजन करायला सचिवाला आदेश दिला. राजाने मोठा समारंभ करून शिवाचे व माठाचे कौतुक केले. शिवाला चांगले माठ बनवले यासाठी माती व माठ घेऊन जायला मोठा बैल भेट दिला. 

रंगवलेली शिंगे, अंगावरची झूल असा भला मोठा रुबाबदार बैल घेऊन ताठ मानेने शिवा घरी आला. राजाने दिलेला बैल पाहायला लोक येऊ लागले. शिवाची बायको चहापाणी, पाहुणचार करू लागली. शिवा बैलाचा चारा भरडा आणायला रोज जाऊ लागला. दिवसभर काम करून गावभर फिरून कचरा खाणारे गाढव शिवाने हाकलून दिले कारण नवा बैल आणला होता. 

बैल पाहायला येणार्‍या लोकांना पाहुणचार करून शिवाची बायको थकून गेली. घरातील खावयाचे सामान संपून गेले. बैलाचा भरडा आणि चारा आणून आणून शिवापण दमला. राहिलेले चार माठ बाजारात जाऊन विकावेत  व पैसे आणून घरात थोडे सामान भरावे असे शिवाने ठरविले. 

आज बैलावरून माठ विकायला जायचा शिवाचा पहिलाच दिवस. शिवाने चार माठांची दोन बोचकी केली आणि बैलाच्या पाठीवर ठेवली व तो बैलाचा कासरा धरून पुढे चालू लागला. बैलाला पाठीवरून ओझे घेऊन जायची सवय नाही हे शिवाला माहीत नसावे. बैलाला पाठीवरील ओझे अगदीच हलके वाटायचे व वेगळे काहीतरी वाटायचे. थोडे अंतर जाताच बैल झपाझप पावले टाकीत वेगात जाऊ लागला. बैलापुढे भराभरा चालत शिवा बाजारात पोचला. बाजारातील आवाज, आरडा ओरड व मोठा जनसमुदाय बघून बैल उधळला. माठाची बोचकी पाठीवरून जमिनीवर पडून फुटून गेली. बाजारात आत बैल आणून बाजारात लोकांना पळापळ करावी लागली यामुळे लोकांनी चिडून शिवाला मारले.

सायंकाळी रडत कडत शिवा घरी आला. बायकोला घडलेली सगळी हकिगत सांगून रडू लागला. बायको रागाने बोलली, ‘बैलापरास आपलं गाढाव बरं हुतं. कुणाला काय बक्षीस उपयोगी येईल हे राजाला कस कळालं नाही आणि काय बक्षीस आणावं हे तुमाला कसं कळालं नाही. नुसता  पैशाचा आणि श्रमाचा नाश झाला.’ बिचारे गाढव या नवरा-बायकोकडं कचरा खात लांबून डोळे पाणावून बघत होते. 

सारांश – कोणास काय बक्षीस देऊन मान देऊन गौरव करावा हे समजले पाहिजे. तसेच कोणते बक्षीस घेणे उपयोगी हेही ठरवले पाहिजे. 

पी. एन. देशपांडे (राज्यपुरस्कार  प्राप्त)

 

Back to top button