सोमय्यांनी तक्रार दिली तर त्याची चौकशी होईल : गृहमंत्री वळसे-पाटील | पुढारी

सोमय्यांनी तक्रार दिली तर त्याची चौकशी होईल : गृहमंत्री वळसे-पाटील

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “सरकार कायद्याबाहेर जात नाही. नवनीत राणांचा कोठडीमध्ये छळ झाला नाही. राणा दाम्पत्यावर जी कारवाई केली आहे, ती कायद्यानुसारच केली आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न हाणून पाडू. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती नाही. सोमय्यांनी तक्रार दिली तर त्याची चौकशी होईल”, असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सोमय्यांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या म्हणाले की, “पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे”, असे मत त्यांनी मांडले.

किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही का केली”, असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला आहे. याविरोधात आपण खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे. माझ्या नावावने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर २३ एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला. हा एफआयआर बोगस असून त्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button