हिंगोली : रेशन धान्याची काळ्या बाजारात विक्री, दोघांवर गुन्हा | पुढारी

हिंगोली : रेशन धान्याची काळ्या बाजारात विक्री, दोघांवर गुन्हा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथून रिसोड परिसरात विक्रीसाठी जाणारे स्वस्त धान्याचे ५२ कट्टे धान्य तसेच एक जीप असा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा ऐवज सेनगाव पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर शुक्रवारी सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिका धारकांसाठी उचल केलेले धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगांवचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री सुकळी खुर्द येथे जाऊन पाहणी केली. यामध्ये एका बोलेरो जीपमध्ये गव्हाचे ८ कट्टे, तर तांदळाचे ४४ कट्टे रिसोड येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी धान्याचे कट्टे व बोलेरो जीप असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी संतोष गवळी यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी जीप चालक पांडुरंग बबन काठोळे ( रा.शेलगाव, जिल्हा वाशिम) व बुधशाल मारोती सिरसाट (रा. सुकळी खुर्द) या दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button