रेल्वे प्रशासनाचा मुजोर कारभार अन् नाशिककरांचा रेल्वे प्रवास | पुढारी

रेल्वे प्रशासनाचा मुजोर कारभार अन् नाशिककरांचा रेल्वे प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेसच्या अपघातानंतर मुंबई-नाशिक रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नाशिककरांचा रेल्वे प्रवास खडतर झाला असून, त्याला रेल्वेचा मुजोर कारभार कारणीभूत ठरत आहे.

रेल्वेसाठी एप्रिल महिन्याची सुरुवात म्हणावी तशी चांगली झालेली नाही. ओढा स्थानकावर शुक्रवारी (दि. 1) रात्री ओव्हरहेड वायर तुटल्याने चार तास सेवा विस्कळीत झाली. नाशिककरांची हक्काची पंचवटी एक्स्प्रेस 2 तास उशिराने मनमाडला पोहोचली. मनमाड-औरंगाबाद मार्गावर मालगाडी घसरल्याने गुढीपाडव्याला पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर ओढावली. पवन एक्स्प्रेसचा अपघात या सर्वांवर कडी ठरल्याने नाशिककरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दोन दिवसांत अपघातग्रस्त मार्ग सुरू होेऊन हा त्रास संपुष्टात येईल. पण अन्य त्रासाचे काय? असा प्रश्न कायम आहे.

कोविडनंतर नाशिककरांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या वाढल्या आहेत. मुंबई-मनमाड राज्यराणी नांदेडपर्यंत नेऊन सर्वप्रथम जिल्हावासीयांना धक्का दिला. त्यातच आता पंचवटी एक्स्प्रेसचा रेक दुसरीकडे वापरला जात आहे. कोविडपासून गोदावरी एक्स्प्रेस अद्यापही बंद असून ती धुळ्यापर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून तिकीट विक्री व अन्य बाबींमधून दरवर्षी कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वे प्रशासनाला मिळते. मात्र, तरीही नाशिकला रेल्वेकडून दरवेळी सापत्न वागणूक दिली जात असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जिल्हावासीयांच्या भावना लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने वेळीच त्यांचा कारभार सुधारणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात त्यांना नाशिककरांच्या तीव्र  संतापाला सामोरे जावे लागू शकते.

आता न्यायालयीन लढा…
कोविडमुळे गेल्या 2 वर्षांपासून गोदावरी यार्डात आहे. रेल्वे मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने देशभरातील रेल्वेगाड्या सुरू केल्या असल्या तरी गोदावरीला अद्यापही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर गाडी सुरू करण्यासाठी लासलगावमधील राजा चॅरिटेबल ट्रस्टने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button