व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना भाजपनं टक्कर दिली; भाजपच्या स्थापनादिनी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन | पुढारी

व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना भाजपनं टक्कर दिली; भाजपच्या स्थापनादिनी पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

व्होट बँकेसाठी राजकारण करणाऱ्यांना भाजपने टक्कर दिलीय. काही लोकांनाच आश्वासने देणे, अधिक लोकांना तळमायला लावणे, भेदभाव, भ्रष्टाचार हे सर्व व्होट बँकेच्या राजकारणाचे साइड इफेक्ट होते. याचे नुकसान, तोटे काय आहेत हे भाजपने नागरिकांना समजावून सांगितले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या ४२ व्या स्थापनादिनी केले.

एक भारत श्रेष्ठ भारत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली. आज भाजपचा ४२ वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्त मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपला यशस्वी बनवण्यासाठी तीन-चार पिढ्या गेल्या. अटलजींनी भविष्यवाणी केली होती की, ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा.’ आज भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. असे सांगत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपचा झेंडा फडकावला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. भाजप मुख्यालयात हा स्थापना दिवस साजरा करण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

मोदी म्हणाले, आज भाजपचा ४२ वा स्थापना दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी हा खूप आनंदाचा प्रसंग आहे. भाजपच्या विकास यात्रेत अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे. करोडो कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज ४२ वर्षांच्या कार्यक्रमात या लोकांचेही स्मरण आहे ज्यांनी जनसंघासाठी दिवा लावला आणि नंतर कमळ फुलवलं. या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी तीन-तीन, चार-चार पिढ्या घालवल्या. स्कंदमातेचा आशीर्वाद सदैव देशवासीयांवर, प्रत्येक कष्टकरी कार्यकर्त्यांवर आणि भाजपच्या प्रत्येक सदस्यावर राहो हीच माझी प्रार्थना आहे.

आमचे सरकार राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून काम करत आहे. आज देशाचीही धोरणे आहेत, तीही ठरलेली आहेत. आज देशाकडे निर्णयशक्ती आहे तशीच निर्धारशक्ती आहे. त्यामुळे आज आपण ध्येये ठरवत आहोत, ती पूर्णही करत आहोत.

काही काळापूर्वी, देशाने तीस लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांच्या निर्यातीचे लक्ष्य पूर्ण केले आहे. कोरोनाच्या या काळात एवढे मोठे लक्ष्य गाठणे भारताची क्षमता दर्शवते. मी देशभरात आणि जगभरात पसरलेल्या भाजपच्या प्रत्येक सदस्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कोहिमापर्यंत भाजप एक भारत, श्रेष्ठ भारताचा संकल्प सातत्याने बळकट करत आहे. तीन दशकांनंतर राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या शंभरवर पोहोचली आहे. यंदाचा स्थापना दिवस आणखी तीन कारणांसाठी महत्त्वाचा ठरला असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी पुढे म्हणाले, पहिलं कारण म्हणजे यावेळी आपण देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. प्रेरणा घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.

दुसरे कारण म्हणजे वेगाने बदलणारी जागतिक परिस्थिती, बदलती जागतिक व्यवस्था. जागतिक दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहा, भाजपची जबाबदारी, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता देशाच्या स्वप्नांचा, देशाच्या संकल्पाचा प्रतिनिधी आहे.

या अमृत काळात, भारताचा विचार स्वावलंबनाचा आहे. स्थानिक जागतिक, सामाजिक न्याय आणि सुसंवाद साधण्याचा आहे. त्यामुळे हा अमृत काळ हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी कर्तव्याचा काळ आहे. आज जगासमोर एक भारत आहे जो कोणत्याही भीती किंवा दबावाशिवाय आपल्या हितासाठी ठाम आहे. जेव्हा संपूर्ण जग दोन विरुद्ध ध्रुवांमध्ये विभागले गेले आहे. तेव्हा भारताकडे मानवतेने ठामपणे बोलणारा देश म्हणून पाहिले जात आहे.

पक्क्या घरापासून गरिबांना शौचालय बांधण्यापर्यंत, आयुष्मान योजनेपासून ते उज्ज्वला, प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यापासून ते प्रत्येक गरिबांना बँक खात्यापर्यंत, अशी अनेक कामे झाली आहेत, ज्यांच्या चर्चेत अनेक तास जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांत देशाने पाहिले आहे की, आपल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करणे हे भाजप सरकारचे प्राधान्य आहे. सबका साथ, सबका विकास या मंत्राने आपण सर्वांचा विश्वास संपादन करत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत. आज संपूर्ण जग पाहत आहे की अशा कठीण काळात भारत ८० कोटी गरीब आणि वंचितांना मोफत रेशन देत आहे.

१०० वर्षांच्या या सर्वात मोठ्या संकटात गरिबांनी उपाशी झोपू नये यासाठी केंद्र सरकार सुमारे ३.५ लाख कोटी रुपये खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button