नाशिक : आयुक्तांच्या बदलीचे राजकीय कनेक्शन | पुढारी

नाशिक : आयुक्तांच्या बदलीचे राजकीय कनेक्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडी शासनातील दोन मंत्र्यांच्या वादात नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची उचलबांगडी करून बळी देण्यात आल्याची बाब राजकीय वर्तुळात सुरू असून, या बदलीचे धागेदोरे नाशिकमधील काही पदाधिकार्‍यांशी जुळत आहेत. यामुळे आगामी काळात या बदल्या आणि नियुक्त्यांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनपाचे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची बदली खरे तर मागील वर्षाअखेरच होणार होती. तशा स्वरूपाच्या हालचालीही झाल्या होत्या. मात्र, ही बदली रोखण्यात आली. परंतु, राजकीय हेवेदावे आणि अंतर्गत वाद यामुळे जाधव यांना बदलीला सामोरे जावेच लागले. गेल्या 15 मार्च रोजीच जाधव यांच्या जागी बृहन्मुंबईचे सहआयुक्त रमेश पवार यांची नाशिक मनपाच्या आयुक्तपदी वर्णी लावण्याची संपूर्ण कार्यवाही झाली होती. केवळ म्हाडा सदनिका आणि भूखंड प्रकरण हे त्याला निमित्तमात्र ठरले.

यामुळे कैलास जाधव यांच्या बदलीसाठी मंत्रालयासह नाशिक मनपातील एक गट कार्यरत होता हे स्पष्ट झाले आहे. त्यातही राष्ट्रवादीचे मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या हिटलिस्टवर कैलास जाधव होते. 2013 पासून नाशिक महापालिकेने गृहनिर्माण महामंडळाला तथा म्हाडाला आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव 20 टक्के सदनिका आणि भूखंडांची माहितीच दिली नसल्याचा ठपका जाधव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परंतु, खरे तर या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज होती. असे असताना केवळ एकाच आयुक्ताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. 2013 पासून अनेक आयुक्त नाशिक महापालिकेत आले. मग कथित गैरप्रकारास एकटे कैलास जाधवच जबाबदार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन मंत्र्यांच्या वादात आणि राजकारणामुळेच कैलास जाधव यांची गच्छंती करण्यात आल्याची बाब लपून राहिलेली नाही. महाविकास आघाडी शासनातील मंत्र्यांवर यापूर्वीदेखील बदल्यांबाबत अनेक आरोप आहे त्यात आणखी एक भर पडली आहे.

हेही वाचा :

Back to top button