काय… ९० तासांत १८ शस्त्रक्रिया | पुढारी

काय... ९० तासांत १८ शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : जगात सध्या असे असंख्य आजार आहेत की, त्यावर आजच्या विज्ञान युगातही उपचार उपलब्ध नाहीत. हत्तीरोग हा त्यापैकीच एक आजार. या आजाराच्या विळख्यात सापडलेल्या एका तरुणाच्या पायावर डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 90 तास शस्त्रक्रिया केली. मॅक्स हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी अशक्य ते शक्य असे हे ऑपरेशन केले.

हत्तीरोगाने पीडित असलेल्या तरुणाचे नाव अमित कुमार शर्मा. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. नेमक्या याचवेळी अमितच्या पायास लिम्फिडिमा नामक आजार झाला. यामुळे त्याचा पाय हत्तीच्या पायासारखा दिसत होता. यावर उपचार करण्यासाठी अमितने आपल्या जवळ असलेले सर्व पैसे संपवले. याशिवाय या आजारामुळे त्याने आपली नोकरीही गमावली. दुर्दैव म्हणजे अमित हाच एकटा घरातील कमावता होता.

2021 मध्ये त्याने मॅक्स हॉस्पिटल पटपडगंजमधील डॉक्टरांना दाखविले. त्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर सहा महिन्यांत एकूण 18 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांना एकूण 90 तासांचा अवधी लागला.
ज्यावेळी अमित मॅक्स हॉस्पिटलला आला त्यावेळी त्याच्या पायाचे वजन 50 किलो होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर हे वजन केवळ 23 किलो इतके आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अमित सध्या चालू-फिरू शकतो. येत्या काही दिवसांत दोन्ही पायांचे वजन समान होईल.

Back to top button