साखर उत्पादनात जागतिक स्तरावर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर | पुढारी

साखर उत्पादनात जागतिक स्तरावर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदाच्या हंगामात आज अखेर सुमारे 108 लाख 95 हजार मे. टन साखर उत्पादन हाती आले असून पिछाडीवर पडलेल्या उत्तर प्रदेशात 80 लाख मे. टन साखर तयार झाली आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा अग्रस्थानी पोहोचला आहे.

जागतिक स्तरावर ब्राझिलमध्ये 399 लाख मे. टन, युरोपियन युनियनमध्ये 158 लाख मे.टन (बीटापासून तयार होणार्‍या साखरेसह) साखर उत्पादन होत असून तुलनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राने मुसंडी घेत जागतिक स्तरावरही तिसरे स्थान पटकाविले आहे. राज्यात चालूवर्षीचा ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये सुमारे अकराशे लाख मे. टन साखर उत्पादनाचा आणि इथेनॉलकडे ऊस वळवून 10 लाख टन साखर कमी करुन एकूण 110 लाख मे.टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता.

ही स्थिती चालूवर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे बदलून ऊस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास 150 लाख मे. टनांनी ऊस उपलब्धतेत वाढ होऊन एकूण 1250 लाख मे. टन ऊस गाळप होईल. तसेच हेक्टरी ऊस उत्पादकता 97 वरुन 110 ते 115 मे. टनाइतकी हाती येत आहे.

देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तर प्रदेशने अग्रस्थान पटकाविले होते. तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी राहिलेला होता. हे चित्र चालूवर्षी मागे पडून महाराष्ट्राने ऊस गाळप, साखर उत्पादनात युपीपेक्षा आघाडी घेत देशात प्रथम क्रमांक मिळविल्याचे सांगून साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, युपीमध्ये 768 लाख मे. टन ऊस गाळप, सुमारे 80 लाख मे. टन साखर उत्पादन तयार झाली आहे.

तर महाराष्ट्रात 1 हजार 52 लाख मे. टन ऊस गाळपातून 108 लाख 95 हजार मे.टन साखर तयार केली आहे. म्हणजेच सुमारे 30 लाख मे. टनांनी राज्याने अधिक साखर उत्पादन घेतलेले आहे. हंगामअखेरही महाराष्ट्रच आघाडीवर राहील.

देशपातळीवर चालूवर्षी सुमारे 347 लाख मे.टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे 125 लाख मे.टन राहील. तसेच देशाच्या एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा 34 टक्क्यांवरुन वाढून तो सुमारे 38.81 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे ते म्हणाले.

उत्पादन घेणारे देश व उत्पादन स्थिती (लाख मे. टनात)

जागतिक बाजारात साखर उत्पादन घेणारे देश व साखर उत्पादन 2021-22. (लाख मे.टन) :  ब्राझिल 399, भारत 347, युरोपियन युनियन 158 (बीटापासूनचे साखर उत्पादन 60 टक्के आहे.) महाराष्ट्र 108 (हंगामअखेर 125 लाख मे.टन अपेक्षित), थायलंड 106, चीन 106, अमेरिका 84, पाकिस्तान 68, मेक्सिको 61, रशिया 61, ऑस्ट्रेलिया 44, इजिप्त 28, ग्वाटेमाला 27 लाख मे.टन साखर उत्पादन राहील.

तरीसुध्दा जागतिक साखर उत्पादनात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. युरोपियन युनियनमधील एकूण साखर उत्पादनात बीटापासून साखर उत्पादनाचा हिस्सा अधिक आहे. तर उसापासूनच्या साखर उत्पादनाचा वाटा 40 टक्के आहे. याचा विचार करता ब्राझिलनंतर अन्य देशांनाही मागे टाकत महाराष्ट्राने साखर उत्पादनात तसे तिसरे स्थान मिळविल्याची माहिती त्यांनी दिली.

ऊस या पिकाची विश्वासार्हता वाढत चालली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून उसाची एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना वेळेवर देण्यासाठी साखर आयुक्तलायाने प्रयत्न केले आहेत. या स्थितीत वाढत्या साखर उत्पादनामुळे महाराष्ट्राने आता ब्राझिल सोडून अन्य देशांनाही मागे टाकल्याचे ताज्या आकडेवरुन दिसत आहे.

 -शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

 

हेही वाचा

Back to top button