पुणे : बिबट्या सफारीवर जुन्नरकरांच्या हक्काविषयी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेने उभी केली चळवळ | पुढारी

पुणे : बिबट्या सफारीवर जुन्नरकरांच्या हक्काविषयी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेने उभी केली चळवळ

पुणे पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त बिबटे जुन्नर तालुक्यात आढळत असून याच तालुक्यात अनेक नागरिकांचा जीव बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे बिबट सफारी जुन्नरलाच व्हावी, यासाठी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने जनजागृती करून स्वराज्य लोक चळवळ उभी करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कोल्हे व विश्वस्त शेखर नलावडे यांनी दिली.

स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष विजय कोल्हे, विश्वस्त शेखर नलावडे, सुजित खैरे, संजय वारुळे, प्रशांत केदारी, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, सचिव मारुती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष कोल्हे म्हणाले, जुन्नर तालुक्यात शेती व्यवसायानंतर पर्यटन हाच आर्थिक रोजगाराचा मुख्य पाया आहे. बिबट सफारी होण्यासाठी जनआंदोलनाची गरज आहे. बिबट्या व मानव हे सहजीवन समीकरण तालुक्यात जुळले पाहिजे, सफारी बारामतीला नेऊन चालणार नाही तर ती जुन्नर तालुक्यात झाली पाहिजे व त्यावर जुन्नरकरांचा हक्क आहे.

बिबट सफारीविषयी तालुक्यातील नागरिकांच्या भेटी, चौकसभा, तज्ञांचा अहवाल, यात्रा, जत्रा आदी ठिकाणी जनजागृती करून जनआंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहचविणार आहे. जुन्नर तालुका फक्त पर्यटन तालुका होऊन चालणार नाही, पर्यटन संधीच्या वाढीसाठी बिबट सफारी गरजेची आहे, असे मत विश्वस्त शेखर नलावडे यांनी व्यक्त केले. यावेळी मारुती जाधव, जितेंद्र देशमुख, सुजित खैरे यांनी आपले विचार मांडले.

हेही वाचा

Back to top button