नाशिकच्या ‘या’ भागात वाढत्या गुंडगिरी विरोधात व्यापार्‍यांचा बंद | पुढारी

नाशिकच्या 'या' भागात वाढत्या गुंडगिरी विरोधात व्यापार्‍यांचा बंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड परिसरातील दत्तनगर येथे व्यावसायिक रिक्षाचालकांची मुजोरी व गुंडगिरीने संतप्त नागरिकांसह परिसरातील दुकानदार, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी होळीच्या दिवशी गुरुवारी (दि. 16) लाक्षणिक बंद पाळला. वाढत्या गुंडगिरीच्या बंदोबस्तासाठी धरणे आंदोलनही केले. आंदोलकांशी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन अंबड पोलिसांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रकरणी आंदोलकांनी वाहतूक शाखा तसेच अंबड पोलिस ठाण्याला निवेदन देऊन, कारवाई न झाल्यास पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी दिला.

दत्तनगरमधील कारगिल चौकात व्यापार्‍यांनी व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केले. यावेळी साहेबराव दातीर, राकेश दोंदे, भागवत आरोटे, अविनाश शिंदे, रामदास दातीर आदींच्या नेतृत्वाखाली रामदास दातीर, गणेश दातीर, परमेश्वर खांडबहाले, विनायक मोरे, समाधान शिंदे, नारायण राऊत, देवा जाधव, सतीश आरोटे, नितीन दातीर, विजय शिंदे, नवनाथ शिंदे, अमोल मुंगले, लताबाई गायधनी, नितीन दातीर यांच्यासह शेकडो व्यापारी व नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अनधिकृत रिक्षाथांबे व मुजोरी करणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळाने पाथर्डी फाटा येथील वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक पराग जाधव, अंबड पोलिस ठाणे येथे निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांना निवेदन दिले.

निवेदनानुसार, दत्तनगर, कारगिल चौक परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढल्याने, दररोज भांडणे, दारू पिऊन शिवीगाळ, मारहाणीसह दुकानांची तोडफोड, भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान प्रकार घडत आहेत. पोलिस चौकीची मागणीवर कार्यवाही होत नाही. वाहतूक विभागाने रिक्षाचालकांच्या तपासणी करण्याची मागणीही केली.

हेही वाचा :

Back to top button