…तर माजी नगरसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागणार | पुढारी

...तर माजी नगरसेवकांना कारवाईला सामोरे जावे लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; महापालिकेच्या 6 व्या पंचवार्षिकचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही शहरात अनेक नगरसेवकांकडून विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. वास्तविक नगरसेवक माजी झाले असले तरी अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपला उद्योग सुरूच ठेवल्याने प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली असून, विद्यमान नगरसेवक म्हणून वा मनपाचे बोधचिन्ह आणि लेटरहेडचा वापर केल्यास अशा माजी नगरसेवकांना प्रशासनाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकला 14 मार्च 2017 पासून प्रारंभ झाला होता. या पंचवार्षिकची मुदत गेल्या 13 मार्च 2022 ला मध्यरात्रीपासून संपुष्टात आल्याने प्रशासनाने महापौरांपासून ते स्थायी समिती आणि गटनेत्यांसह इतरही पदाधिकार्‍यांची वाहने जमा करून कार्यालयांना टाळे ठोकले आहेत. तसेच सर्वच नगरसेवकांचे नगरसेवक पदही रद्द झाले आहे. असे असताना काही नगरसेवक मात्र अजूनही स्वत:ला नगरसेवक म्हणून पाचारण करत उद्घाटन सोहळे रंगवताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेच संबंधितांकडून कामे दाखविण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु, आता संबंधित माजी नगरसेवकांना विद्यमान म्हणून स्वत:ला मिरविणे महागात पडणार आहे.

विकासकामांसह अन्य कामांसाठी नगरसेवकांना लेटरहेड तसेच मनपाचे बोधचिन्ह वापरण्याची परवानगी त्यांच्या कार्यकाळापुरतीच दिली जाते. मात्र, आता कार्यकाळ संपुष्टात आल्याने माजी नगरसेवकांना लेटरहेड व बोधचिन्हाचा वापर करता येणार नाही. लेटरहेडचा वापर झालाच तर स्वत:च्या नावापूर्वी ’माजी’ लावावे लागणार आहे.

हेही वाचा :

Back to top button