भारतातील रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असतील : नितीन गडकरी | पुढारी

भारतातील रस्ते २०२४ पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असतील : नितीन गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2024 मध्ये भारत रस्त्यांच्या जाळ्याबाबत अमेरिकेच्या बरोबरीने असेल असे म्हटले आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुढील दोन वर्षांचा कृती आराखडा सांगितला. या कृती आराखड्यांतर्गत त्यांनी भारतातील रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.

केंद्र सरकारची पूर्ण तयारी : भारताची अमेरिकेशी बरोबरी

नितीन गडकरी यांनी राज्यसभेत काँग्रेस खासदार एल. हनुमंतय्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) देशात 1.47 लाख किमीपेक्षा जास्त रस्ते बांधत आहे. तसेच, NHAI 22 हरित महामार्ग देखील बांधत आहे आणि 2024 च्या अखेरीस भारतातील रस्‍ते हे अमेरिकेबरोबरचे नेटवर्क तयार होईल. आणि त्‍याचबरोबर रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याची गरज आहे असे गडकरी म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले की, केवळ रस्ते करणे पुरेसे नाही आणि ते बांधणेही मोठे काम नाही, परंतु यापेक्षा रस्ता सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. भारतात दरवर्षी सरासरीने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या युद्धापेक्षा जास्त आहे. भारतात दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अशा परिस्थितीत रस्ते तयार करणे, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, रस्ता सुरक्षा या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत लोकांमध्ये जागरूकता आणि शिक्षण देणेही गरजेचे आहे.

दरम्‍यान, महामार्गाचे बांधकाम आणि त्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती ही केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब आहे. त्यासाठी रस्ते वाहतूक विभाग प्रयत्नशील आहे. रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी हा विभाग ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्‍हणून ओळखला जात आहे. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात, त्या अपघातांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जातील.

प्रादेशिक अधिकार्‍यांना ब्लॅक स्पॉटवरील रस्ते दुरुस्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत आणि 50 लाख रुपयांच्या आर्थिक मंजुरीसह डिझाइन सदोष असल्यास पुनर्बांधणी करण्याचे अधिकार ही देण्यात आले आहेत. रस्ते अपघात हा सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत ते म्‍हणाले, उत्तम रचना आणि बांधकामामुळे रस्ते अपघातात 28.28 टक्के घट झाली आहे.

महामार्गांवर अपघात झाल्यास भरपाईमध्ये वाढ

तसेच, महामार्गावर अपघात झाल्यास नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. मृत्यू झाल्यास जिल्हाधिकारी दोन दिवसांत मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तमिळनाडूतील अपघात स्थळांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेने 7,500 कोटी रुपये दिले आहेत, असेही गडकरी म्हणाले. तामिळनाडूतील निकालाने खूश होऊन, आम्ही ते NHAI अंतर्गत संपूर्ण रस्त्यांच्या नेटवर्कपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे गडकरी म्‍हणाले.

हेही वाचा  

Back to top button