लखीमपूर खिरी प्रकरण : आशिष मिश्राचा जामीन का रद्द केला जाऊ नये : सर्वोच्च न्यायालयाची विचारणा | पुढारी

लखीमपूर खिरी प्रकरण : आशिष मिश्राचा जामीन का रद्द केला जाऊ नये : सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसंस्‍था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी  येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याचा जामीन का रद्द केला जाऊ नये? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी उत्तर प्रदेश सरकारला केली. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आहे.

लखीमपूर खिरी प्रकरणातील साक्षीदारांवर हल्ला झाल्याची बाब गेल्या आठवड्यात ऍड. प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्व साक्षीदारांना आवश्यक ती सुरक्षा द्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिष मिश्रा याचा जामीनअर्ज मंजूर केला होता. दरम्यान गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपीला जामीन देणे चुकीचे असल्याचे भूषण यांनी सांगितले. अंगावर गाडी घालण्याच्या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अन्य चार लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयातील सदर प्रकरणाची पुढील सुनावणी होळीच्या सुटीनंतर होणार आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button