मुंबई : पुढारी वृत्तसेवा
फोन टॅपिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आज बुधवारी कोलाबा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांची वेगवेगळी नावे ठेवत साठ दिवस फोन टॅप केल्याचा आरोप आहे. हे फोन टॅप करताना प्रत्येकाला वेगळे नाव देण्यात आले होते. मात्र, चौघांचे सहा मोबाईल क्रमांक टॅपिंगसाठी पाठविताना संपूर्ण माहिती दिली नसल्यामुळे हे नंबर कोणाच्या नावावर आहेत, हे समजू शकले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरीष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. रश्मी शुक्ला या बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आपला जबाब नोंदविण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात पोहमचल्या. येथील पोलीस अधिकाऱ्यांकडून शुक्ला यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. त्या जबाबात काय माहिती देतात आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केल्यानंतर शासनाच्या आदेशाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले गेल्याने आता कुलाबा पोलीस ठाण्यातही भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यात न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्याने शुक्ला या बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आपला जबाब नोंदविण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने यापूर्वी फोन टॅपिंग आणि पोलिसांच्या बदल्यांचे गोपनीय दस्तऐवज लीक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करुन काहींचे जबाबही नोंदवले होते. मार्च २०२१ मध्ये वांद्रे-कुर्ला संकूल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात मात्र शुक्ला यांचे आरोपी म्हणून नाव देण्यात आले नाही. मात्र त्यानंतर आता शुक्ला यांच्या विरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.