पुणे : पुढारी वृत्तसेवा : फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न फारच अवघड होते, तर बायोलॉजीचे प्रश्न थोडे सोप्पे होते. प्रश्न अभ्यासक्रमातीलच होते. परंतु, फिरवून प्रश्न विचारण्यात आल्यामुळे गोंधळात पडल्यासारखे झाले असल्याची माहिती नीट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी दिली आणि नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी नीट प्रवेश परीक्षा रविवारी (दि. 5) देशभरात पार पडली. 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'कडून (एनटीए) ही परीक्षा दुपारी 2 ते 5.20 या वेळेत घेण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून देशभरातील 557 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांतील परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा 13 भाषांमध्ये घेण्यात आली. यामध्ये इंग्रजी, हिंदी, असामी, बंगाली, ओडिया, कन्नड, पंजाबी, उर्दू, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलगू आणि तामिळ भाषेचा समावेश आहे.
नीट परीक्षेसंदर्भात प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. यावर एनटीएकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एनटीएने चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. परंतु, पेपर फुटल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. राजस्थानमधील एका परीक्षा केंद्रावर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली होती. एनटीएने या चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. उच्च माध्यमिक आदर्श विद्या मंदिर (मुलींची), सवाई माधोपूर येथे एका वेगळ्या घटनेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका चुकून देण्यात आली आणि पर्यवेक्षक चूक सुधारत असताना, काही विद्यार्थी जबरदस्तीने प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा हॉलमधून बाहेर पडले, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे.
नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका घेऊनच हॉलमधून बाहेर पडण्याची परवानगी आहे. परंतु, काही विद्यार्थी जबरदस्तीने बाहेर पडले. त्यामुळे दुपारी चारच्या सुमारास प्रश्नपत्रिका इंटरनेटवर प्रसारित झाली. परंतु, तोपर्यंत देशभरातील इतर सर्व केंद्रांवर परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही, असेदेखील एनटीएकडून सांगण्यात आले आहे. या वर्षी नीट परीक्षेसाठी विक्रमी 23 लाख उमेदवारांनी नोंदणी केली. ज्यामध्ये 10 लाखांहून अधिक पुरुष विद्यार्थी, 13 लाखांहून अधिक मुली आणि 24 विद्यार्थ्यांनी तृतीयपंथी श्रेणीअंतर्गत नोंदणी केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक तीन लाख 39 हजार 125 उमेदवारांची नोंदणी झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रातून दोन लाख 79 हजार 904 नोंदणी करण्यात आली आहे.
हेही वाचा