नाशिक : ‘निवडणूक लढणार आणि नडणार’ या नाराज भूमिकेने करंजकरांची मुख्यमंत्र्यांसोबत रात्रीतून भेट | पुढारी

नाशिक : 'निवडणूक लढणार आणि नडणार' या नाराज भूमिकेने करंजकरांची मुख्यमंत्र्यांसोबत रात्रीतून भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रविवारी (दि.५) रात्री उशिरा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली असून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.

निष्ठावंत शिवसैनिक म्हणून करंजकर यांची ओळख आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर ते गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत होते. नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांना ठाकरे गटातर्फे उमेदवारी दिली जाईल, असे पक्षाच्या नेत्यांकडून वर्षभरापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. परंतू, निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी करंजकरांना दिलेले आश्वासन पाळले नाही. ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारीची माळ सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गळ्यात टाकल्याने करंजकर नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात करंजकर यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेटही मिळू शकली नाही. त्यामुळे ते व्यथित होते. ‘आता मी लोकसभा निवडणूक लढणार आणि नडणार’, अशी भूमिका त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखविली होती.

करंजकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात शिंदे गटाकडून खा. हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली गेली. त्यामुळे करंजकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर करंजकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शनिवारी (दि.४)  देवळाली कॅम्प येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर टीकास्त्र डागत निवडणूक लढविण्यासंदर्भात दोन दिवसात भूमिका जाहीर करण्याचे स्पष्ट केल्याने ते शिंदे गटात जाणार या चर्चेने पुन्हा जोर धरला होता. रविवारी (दि.५) सायंकाळी ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. रात्री ११ वाजेनंतर करंजकर आणि शिंदे यांच्यात भेट होणार होती. या भेटीत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात करंजकर यांना विचारले असता त्यांनी शिंदे गटात प्रवेशाची शक्यता नाकारली नाही.

Back to top button