नाशिक : सहाव्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल गेला ; महिलेचा मृत्यू | पुढारी

नाशिक : सहाव्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल गेला ; महिलेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल जावून पंचवीस वर्षीय तरुणी खाली कोसळली. महिला कामगार रुक्मिणी पिराजी बोळे ही ध्रुवनगरच्या एका इमारतीमध्ये काम करीत होती. अचानक तोल गेल्याने तिच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारासह इतर संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये राजेंद्र पंडित सोनजे यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. तिथे कार्यरत कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले. मंगळवारी (दि.८) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पाणी मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तरुण कामगार रुक्मिणी पाणी मारत असताना तिचा तोल गेला. रुक्मिणी सहाव्या मजल्यावर खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाली. तिला सुपरवायझर जितेंद्र रामकृष्ण माने यांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले.

जिल्हा रुग्णालयातील डॉ. शिंदे यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोनजे आणि माने यांसह इतर संबंधितांबाबत चौकशी सुरू आहे. हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी जबाबनोंदणी सुरू राहिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button