WI vs ENG : १२ चेंडूत हव्या होत्या ९ धावा आणि… | पुढारी

WI vs ENG : १२ चेंडूत हव्या होत्या ९ धावा आणि...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील सातव्या सामन्यात बुधवारी वेस्ट इंडिजने (WI vs ENG) रोमहर्षक असा विजय मिळवून इंग्लंडवर अवघ्या सात धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना विंडिजने ५० षटकांत ६ बाद २२५ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी २२६ धावांची गरज होती. मात्र, प्रत्युत्तर देताना त्यांचा संघ ४७.४ षटकात २१८ धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर टॅमी ब्युमॉन्टे (४६) सर्वाधिक धावा केल्या. तर सोफिया डंकलेने ३५ चेंडूत ३८ आणि डॅनियल व्याटने ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शामिलिया कोनेलने ३ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने (WI vs ENG) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी त्यांचा निर्णय योग्य ठरविला. डायंड्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूज यांनी ८१ धावा जोडल्या. मॅथ्यूज ४५ धावांवर बाद झाली. तिची विकेट सोफी एक्लेस्टनने घेतली. तर डॉटिन ३१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार स्टेफनी टेलरला खातेही उघडता आले नाही आणि किसिया नाइटही अवघ्या ६ धावा करून बाद झाली.

Image

येथून संकटात सापडलेल्या वेस्ट इंडिजसाठी शेमन कॅम्पबेल आणि चिडियन नेशन यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेली. कॅम्पबेल अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाली. ती ६६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर नेशन ४९ धावांवर नाबाद राहिली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने सर्व षटके खेळताना ६ गडी गमावून २२५ धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टनने ३ बळी घेतले. (WI vs ENG)

Image

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची खास सुरुवात झाली नाही. त्यांची पहिली विकेट ३१ धावांवर पडली. सलामीवीर लॉरेन विनफिल्ड १२ धावा करून बाद झाली. त्यानंतर आणखी काही विकेट झटपट पडल्या. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने शंभर धावांच्या आत पाच विकेट गमावल्या.

Image

टॅमी ब्युमॉन्टने ४६ धावा केल्या. येथून डॅनियल व्याट आणि सोफिया डंकले यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, डंकले (३८) आणि वायट (३३) या दोघीही १५४ धावांवर बाद झाल्या आणि त्यानंतर इंग्लंड संघाच्या अडचणीत वाढ झाली. पण सोफी एक्लेस्टनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. तिला केट क्रॉसने चांगली साथ दिली. या जोडीने नवव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत संघाला लक्ष्याच्या जवळ आणले. इंग्लंडला शेवटच्या तीन षटकात ९ धावांची गरज होती, पण ४८व्या षटकात वेस्ट इंडिज गोलंदाजा अनिसा मोहम्मदने बाजी पालटली. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्रॉस (२७) धावबाद झाली आणि त्यानंतर अन्या शार्बसोल (०) हिला अनिसाने बाद करून संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडला ४७.४ षटकात सर्व विकेट्स गमावून केवळ २१८ धावा करता आल्या. एक्लेस्टन ३३ धावांवर नाबाद राहिली.

Image

सामन्याचा थरारक क्षण..

४८.१ : अनिसाच्या पहिल्या चेंडूवर एक्लेस्टोन स्ट्राइकवर होती. तिने वेगवान शॉट खेळला जो थेट अनिसाच्या हातात गेला. तो एक झेल होता, पण अनिसा मोहम्मदला चेंडू पकडता आला नाही. मात्र, चेंडू तिच्या बोटांना आदळल्यानंतर तो विकेटला लागला. नॉन स्ट्राईकला उभी असलेली केट क्रॉस क्रीजच्या बाहेर होती त्यामुळे ती धावबाद झाली.

४८.२ : आता इंग्लंडची शेवटची विकेट शिल्लक होती. एक्लेस्टोनने दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव काढली. त्यामुळे स्ट्राइक अन्या शार्बसोलकडे आला.

४८.३: अन्या शार्बसोलने हा चेंडू डॉट घालवला. त्यामुळे एकही धाव मिळाली नाही.

४८.४ : चौथ्या चेंडूवर अन्याने पुढे येत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण ती क्लिन बोल्ड झाली. अनिसाने अन्याला यॉर्कर बॉलवर बोल्ड केले. याबरोबरच वेस्ट इंडिजने सामना जिंकला.

Back to top button