सातारा : दोन मोर, सात लांडोरांची शिकार; संशयित ताब्‍यात | पुढारी

सातारा : दोन मोर, सात लांडोरांची शिकार; संशयित ताब्‍यात

कराड ; पुढारी वृत्तसेवा : मोर व लांडोर यांच्या शिकार प्रकरणी वन विभागाने एकाला रंगेहाथ पकडले. आटके (ता. कराड) येथे आज (सोमवार) ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची शिकार झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिकारीसाठी वापरलेले साहित्य वनविभागाने जप्त केले असून, संशयिताला अटक केली आहे.

गोरख राजेंद्र शिंदे (रा. कृष्णा कारखाना, ता. कराड, मूळ रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे वन विभागाने अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने दोन मोर व सात लांडोर यांची फासकीच्या सहाय्याने शिकार करून प्लास्टिकच्या पांढऱ्या पोत्यात भरून जात असताना वन विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

याबाबत सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी सांगितले की, कराड तालुक्यातील आटके येथे मोराची शिकार केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने आटकेतील खडकुळी, सावराई मळी परिसरात कृष्णा नदीच्या दक्षिण बाजूस छापा टाकून संशयित गोरख शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या पोत्यामध्ये दोन मोर व सात लांडोर मृत अवस्थेत आढळून आल्या. वन विभागाने त्याच्या जवळील साहित्य व मृत अवस्थेतील मोर, लांडोर तसेच संशयिताकडील दुचाकी व मोबाईल जप्त केला. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे करीत आहेत.

सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ए.पी. सवाखंडे, बी.सी. कदम, काळे, रामदास घावटे, सुनिता जाधव, रमेश जाधवर, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, जयवंत काळे, योगेश बडेकर यांनी ही कारवाई केली.

वनविभागाचे लोकांना आवाहन…

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यास वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये संरक्षण देण्यात आले आहे. त्याच्या शिकार प्रकरणी संशयितास सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. लोकांनी वन्य प्राणी किंवा पक्षांची शिकार करणाऱ्याबाबत वन विभागास किंवा टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी सांगितले.

Back to top button