‘हे’ दूध महागले!, प्रति लिटर २ रुपयांची वाढ | पुढारी

‘हे’ दूध महागले!, प्रति लिटर २ रुपयांची वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमूलने (amul milk) देशभरातील बाजारपेठेत दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंगळवार, 1 मार्चपासून अहमदाबाद आणि सौराष्ट्र (गुजरात) बाजारपेठेत अमूल गोल्ड दुधाची किंमत 30 रुपये प्रति 500 ​​मिली (अर्धा लिटर) असेल. यासोबतच अमूल ताझाच्या प्रत्येक 500 मिली दुधासाठी 24 रुपये आणि अमूल शक्ती दुधाच्या 500 मिलीसाठी 27 रुपये मोजावे लागणार आहेत.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये दुधाचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ सोना, ताझा, शक्ती, टी-स्पेशल, तसेच गाय आणि म्हशीच्या दुधासह अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर लागू होईल. तब्बल 7 महिने 27 दिवसांच्या अंतरानंतर दरात वाढ करण्यात येत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

GCMMF च्या म्हणण्यानुसार, अमूलने (amul milk) गेल्या 2 वर्षांत त्यांच्या ताज्या दुधाच्या श्रेणीतील दरात 4 टक्के वाढ केली आहे. पॅकेजिंग, लॉजिस्टिक, पशुखाद्याचा खर्च वाढल्यामुळे ही किंमत वाढली आहे, त्यामुळे दूध हाताळणी आणि उत्पादनाचा एकूण खर्च वाढला आहे.

Back to top button