#RussiaUkraineWar: युक्रेनचे जग्गजेते बॉक्सिंगपटू भाऊ रणांगणात!, रशियन सैन्याला ठोसा देण्यास सज्ज | पुढारी

#RussiaUkraineWar: युक्रेनचे जग्गजेते बॉक्सिंगपटू भाऊ रणांगणात!, रशियन सैन्याला ठोसा देण्यास सज्ज

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का अशी भिती सर्वांनाच वाटू लागली आहे. बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या युक्रेनमधील परिस्थिती भयावह आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कोणत्याही प्रकारे झुकणार नाहीत अशी त्यांनी भुमिका घेतली आहे. (Russia- Ukraine war)

अशा परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनीही सर्वसामान्य नागरिकांना शस्त्र हाती घेण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान युक्रेनचे दोन बॉक्सरमध्ये विश्वविजेतेपद पटकवलेल्या भावांनी आपला देश वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. ते शस्त्र हातात घेऊन देशासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत.

युक्रेनमधील ख्यातनाम बॉक्सर व्लादिमीर क्लिट्स्को आणि त्याचा भाऊ आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी लोकांसाठी पुढे आले आहेत. माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर आणि युक्रेनच्या सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक, व्लादिमीर क्लिट्स्को रशियासोबतच्या या लढाईत त्यांचा देश खंबीरपणे उभा राहील असे त्यांना वाटते. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या ४५ वर्षीय महान बॉक्सर क्लिट्स्को याने आपल्या देशवासियांना धीर देण्यासाठी ट्विट करत आधार दिला आहे.

व्लादिमीर क्लिट्स्को, याने दोनदा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली आहे, तो ट्विटमध्ये म्हणतो, आमचा देश युक्रेन मजबूत आहे याची आम्हाला खात्री आहे! कीव ही आमची निर्भीड राजधानी आहे. आमचे लोक त्यांच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि शांततेसाठी ओळखल्या जाणार्‍या युरोपमध्ये एकत्र आले आहेत. त्याच्या अस्तित्वाची इच्छा असीम आहे. युक्रेन महान आहे!’

Russia- Ukraine war : विटाली क्लिट्स्को २०१४ पासून कीवचे महापौर

२०२१ मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग हॉल ऑफ फेममध्ये त्यानी सहभाग नोंदवला होता. युक्रेनियन बॉक्सर क्लिट्स्को बंधुनी या महिन्यात सैन्यात राखीव म्हणून स्वाक्षरी केली. व्लादिमीर क्लिट्स्कोचा भाऊ विटाली क्लिट्स्को हे कीवचे महापौर आहेत. ते माजी बॉक्सर विश्वविजेते देखील आहेत. ५० वर्षीय विटाली गुरुवारी म्हणाला, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला हे करावे लागणार आहे. मी युद्धात जाईन. माझा युक्रेनवर विश्वास आहे. माझा माझ्या देशवासीयांवरही विश्वास आहे.

Back to top button