#RussiaUkraineWar : युक्रेनची महिला खासदार बनली ‘झाशीची राणी’, रशियाविरुद्ध घेतले हाती शस्त्र! | पुढारी

#RussiaUkraineWar : युक्रेनची महिला खासदार बनली ‘झाशीची राणी’, रशियाविरुद्ध घेतले हाती शस्त्र!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या अनेक शहरांवर आक्रमकतेने हल्ला सुरूच आहे. पुतीन यांच्या आदेशानुसार सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवावी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आणि चर्चेच्या माध्यमातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात १९८ युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे आरोग्य मंत्री व्हिक्टर ल्याश्को यांनी दिली आहे. (#RussiaUkraineWar)

दरम्यान, या युद्धाच्या काळात सोशल मीडियावर अशी काही छायाचित्रे पाहायला मिळत आहेत, जी पाहून अनेकांचे डोळे नक्कीच पाणावतील. युक्रेन सरकारने आपल्या नागरिकांना सैन्यात भरती होऊन रशियाविरुद्ध हाती शस्त्र घेण्याचे आवाहन केले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी वयाची अट नसल्याचे युक्रेन सरकारने जाहीर केले आहे. या आवाहनानंतर सर्वसामान्य नागरिकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकांनी देशाच्या रक्षणासाठी रशिया विरुद्ध हाती शस्त्र घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनने आपल्या खासदारांना शस्त्रे वाटली आहेत. दरम्यान, युक्रेनच्या ३६ वर्षीय महिला खासदार किरा रुडिक (Kira Rudik) यांनी एक फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (#RussiaUkraineWar)

रशियाला टशन देण्यासाठी युक्रेनचे खासदार रणांगणात…

खासदार किरा रुडिक (Kira Rudik) यांनी हाती मशिन गन घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार रुडिक यांनी ट्विट केले की तिला कलाश्निकोव्ह कसे वापरायचे हे माहित आहे. हे खूप खरे वाटते कारण काही दिवसांपूर्वी ते माझ्या मनात कधीच येत नव्हते. युक्रेनच्या पुरुषांप्रमाणेच आपल्या महिलाही देशाच्या मातीचे रक्षण करतील. (#RussiaUkraineWar)

फोटोमध्ये ३६ वर्षीय महिला खासदार किरा रुडिक (Kira Rudik) रायफल घेऊन उभ्या आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कलाश्निकोव्ह रायफल कशी हाताळायची याची मला जाण आहे. युक्रेनच्या पुरुषांप्रमाणे आमच्या महिलाही देशाचे रक्षण करण्यास समर्थ आहेत.’ (#RussiaUkraineWar)

मातृभूमीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार…

‘हा माझा देश, माझी जमीन आणि माझे शहर आहे. माझ्या मात्रभूमीसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे,’ असे त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. खासदार रुडिक (Kira Rudik) यांचा व्हायरल फोटो पाहून नेटकरी त्यांच्या राष्ट्रभावने प्रति आदर व्यक्त करताना दिसत आहेत. हजारो लोकांनी त्यांचा हा फोटो रिट्विट केला आहे. तर या फोटोला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘इश्वर तुमच्या आणि तुमच्या देशासोबत आहे.’ (#RussiaUkraineWar)

एमपी केइरा रुडिक (Kira Rudik) या अॅमेझॉन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म रिंगच्या माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. रिंग अशी उत्पादने तयार करते जी स्मार्ट घर आणि घराची सुरक्षा वाढवते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian president Volodymyr Zelenskyy) यांनी सेल्फी स्टाइलमधील एक व्हिडिओ शूट करून तो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले आहे.

‘मी इथेच आहे. आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही देशासाठी लढू. कारण आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहे.” असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. त्यांनी शरणागती पत्करली अथवा पलायन केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन तसेच पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांशी राजनैतिक पातळीवर चर्चा केली जात आहे. मित्रराष्ट्रांकडून शस्त्रांची मदत येत असून युद्धविरोधी भूमिका कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (#RussiaUkraineWar)

Back to top button