जयप्रभा स्टुडिओ पर्यायी जागेचा तातडीने अहवाल द्या; शासनाचे आयुक्तांना पत्र : राजेश क्षीरसागर यांची माहिती | पुढारी

जयप्रभा स्टुडिओ पर्यायी जागेचा तातडीने अहवाल द्या; शासनाचे आयुक्तांना पत्र : राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरवासीयांच्या भावना लक्षात घेऊन जयप्रभा स्टुडिओ जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्यासंदर्भातील अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करा, असे पत्र नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना सोमवारी पाठवले आहे. परिणामी, जयप्रभा स्टुडिओ जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 फेब—ुवारीला जयप्रभा स्टुडिओसंदर्भात पत्र पाठवले होते. तसेच मुंबईत भेटून जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीदारांना पर्यायी जागा देऊन जागा शासनाच्या ताब्यात घेऊन विकसित करावी, अशी मागणीही केली होती. त्यानंतर तत्काळ मंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदनाच्या अनुषंगाने तत्काळ तपासून सादर करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार कक्ष अधिकारी रश्मिकांत इंगोले यांनी कोल्हापूर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

लेखी पत्राद्वारे अहवाल मागविताना जयप्रभा स्टुडिओची जागा भारतरत्न कै. लता मंगेशकर यांच्या मालकीची असून त्यामधील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वीच विकली आहे. उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररीत्या खरेदी केली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या जाग्यावर त्यांचे स्मारक बांधण्यात यावे, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, अशा जनभावना आहेत. त्यामुळे सदर जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा दिल्यास स्टुडिओची जागा शासनास हस्तांतरित करण्यास फर्मने सहमती दर्शवली आहे. याप्रकरणी मागणीही त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे केली आहे. त्याअनुषंगाने आपला सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, असेही क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Back to top button