आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर | पुढारी

आमदार नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर

सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर

शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना आज बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. काल मंगळवारी जामीन मिळावा म्हणून आमदार नितेश राणे यांचे वकील, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत, वकील साळवी यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे यांची गेल्या सोमवारी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवलीत हल्ला झाला. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात आ. नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आपल्याला अटक होवू नये यासाठी आ. राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च नायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आ. नितेश राणे यांचा अटकपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवार, दि. २४ जानेवारी रोजी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात हजर होण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने आ. नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार राणे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button