नितेश राणेंच्या दीड तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं? | पुढारी

नितेश राणेंच्या दीड तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

संतोष परब हल्ल्यातील संशयित असलेले आ. नितेश राणे सोमवारी सकाळी आपले वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्यासह सकाळी 10.30 वाजता कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर या प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी तब्बल दीड तास आ. राणेंची संतोष परब हल्ल्याप्रकरणी चौकशी केली. आ. राणे हे संतोष परब हल्ला गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस ठाण्यात आले होते, एवढे सांगत अधिक तपशील सांगण्यास पोलिस निरीक्षक हुंदळेकर यांनी नकार दिला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकी दरम्यान शिवसेना पॅनेलचे प्रचारप्रमुख असलेले संतोष परब हे 18 डिसेंबर 2021 रोजी दुचाकीने घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला कारच्या सहाय्यानेमागून धडक दिली. कणकवली- नरडवे रोडवर हा प्रकार स. 11 वा. च्या सुमारास घडला होता. त्यानंतर संतोष परब हे रस्त्यावर पडले असता कारमधील व्यक्तींनी खाली उतरत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात परब हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी श्री. परब यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत फोंडाघाट चेकपोस्टवर चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रमुख संशयित सचिन सातपुतें याला सिंधुदुर्ग पोलिसांनी नवी दिल्ली येथे अटक केली.

याप्रकरणी संतोष परब यांनी दिलेली तक्रार तसेच या संशयितांचे जबाबानुसार पोलिसांनी आ. नितेश राणे, जि. प. चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत व जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर गुन्हे दाखल केले. दरम्यान, आ. नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी यापूर्वी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत आ. राणे व गोट्या सावंत यांची चौकशी कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

यानंतर आ.राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र, सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. यावर आ. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता, उच्च न्यायालयानेही जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत जामीन अर्ज फेटळला. मात्र, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी न्यायालयाने आ. राणे यांना 27 जानेवारीपर्यंत अटक कारवाईपासून संरक्षण दिले आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी आ. नीतेश राणे हे आपले वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांच्या सह कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले. सकाळी 10.30 वा. च्या सुमारास पोलिस ठाण्यात आलेले आ. राणे सुमारे दीड तासाने म्हणजेच दु. 12 वा. च्या सुमारास पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. याबाबत कणकवलीचे पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांना विचारले असता, आ. राणे हे संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित असून त्या अनुषंगाने चौकशीसाठी ते पोलिस ठाण्यात आले होते, असे सांगितले. मात्र, चौकशीचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.

हेही वाचलत का? 

 

Back to top button