Delhi Corona : दिल्लीत शाळा, कॉलेज, जिम पुन्हा सुरू होणार! | पुढारी

Delhi Corona : दिल्लीत शाळा, कॉलेज, जिम पुन्हा सुरू होणार!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) एक महत्त्वाची बैठक शुक्रवारी पार पडली. ज्यामध्ये दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था आणि जिम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर रात्रीच्या कर्फ्यूचा कालावधी एक तासाने (रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत) कमी करण्यात आला आहे.

दिल्लीतील उच्च शिक्षण संस्था एसओपी अंतर्गत खुले केले जातील आणि कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जातील. दिल्लीतील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. ७ फेब्रुवारीपासून ९वी-१२वीच्या शाळा सुरू होणार आहेत. तर नर्सरी ते आठवीपर्यंतच्या शाळा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. लसीकरण न झालेल्या शिक्षकांना शाळेत येऊ दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

त्याच वेळी, डीडीएमएने दिल्लीतील कार्यालयांना १०० टक्के उपस्थितीसह काम करण्याची परवानगी दिली. याशिवाय, या बैठकीत कारमध्ये एकट्या असलेल्या ड्रायव्हरलाही मास्क घालण्याच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. या नियमाबाबत हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती, ज्यावर कोर्टानेही नाराजी व्यक्त केली होती. नवीन नियमानुसार कारमध्ये फक्त ड्रायव्हर असेल तर त्याला मास्क घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

अलीकडेच दिल्ली जिम असोसिएशनच्या सदस्यांनी दिल्ली सरकारच्या विरोधात निदर्शने करत जिम पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. सगळं खुले करण्यात आले आहे, पण फक्त जिम बंद आहेत, असे जिम असोसिएशनने म्हटले होते. दुसरीकडे, शाळा बंद केल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे शाळा सुरू कराव्यात, असे १६०० पालकांचे म्हणणे होते. पालकांच्या या मागणीला खुद्द उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही पाठिंबा दिला होता.

Back to top button