डिसले यांचा माफीनामा; रजेसाठी पैशाचे आरोप अनवधानाने | पुढारी

डिसले यांचा माफीनामा; रजेसाठी पैशाचे आरोप अनवधानाने

सोलापूर पुढारी वृत्तसेवा: ‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे माफीनामा सादर केला. रजा मंजूर करण्यासाठी माझ्याकडून पैसे मागितल्याबद्दलचे आरोप अनवधानाने झाले. तसा प्रकार झाला नसल्याचा त्यांनी लेखी खुलासा केला आहे. यापुढे मी प्रसारमाध्यमांपुढे जाणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी सीईओ स्वामी यांच्याकडे दिलगिरी व्यक्‍त केली आहे.

अमेरिका येथील फुल ब्राईट या संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी रणजित डिसले यांची निवड झाली आहे. त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी सहा महिन्यांची रजा आवश्यक होती. मात्र जि. प. शिक्षण विभागाकडून रजा मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. शिक्षणाधिकार्‍यांकडून रजा मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. या आरोपांमुळे ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्‍त शिक्षकास जि. प. प्रशासनाकडून त्रास देण्यात येत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली होती. याबद्दल चर्चा राज्यभर होताच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणी लक्ष घालून दिलीप स्वामी यांना डिसले गुरुजी यांना रजा मंजूर करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार जि. प.प्रशासनाने त्यांना सहा महिन्यांची रजाही मंजूर केली. रजा मंजूर केल्यानंतर स्वामी यांनी डिसले यांना प्रशासनाची बदनामी केल्याची भूमिका घेत रजेसाठी पैसे कोणी, कधी मागितले? याबाबत कोणाकडे तक्रार केली होती काय, अशी विचारणा करणारी नोटीस देत केली होती. त्यामुळे डिसले गुरुजी यांची अडचण निर्माण झाली होती. त्यासंदर्भात आज डिसले यांनी खुलासा केला. यामध्ये पैसे मागितल्याचे आरोप अनावधानाने व चुकीचे झाल्याचे त्यांनी खुलाशात म्हटले. याप्रकरणी आता प्रशासनाकडे दिलगीरी व्यक्‍त करून हा विषय येथेच संपविण्याची भूमिका व्यक्‍त केली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button